मानसखंड एक्स्प्रेस पुण्याहून रवाना; भारत गौरव ट्रेनची दुसरी यात्रा, ३०२ पर्यटकांचा सहभाग
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2024 09:49 AM2024-05-23T09:49:18+5:302024-05-23T09:52:15+5:30
Manaskhand Express Bharat Gaurav: मानसखंड एक्स्प्रेस टुरिस्ट ट्रेनच्या माध्यमातून उत्तराखंडमधील कमी माहिती असलेल्या ठिकाणी पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
Manaskhand Express Bharat Gaurav: भारत गौरव ट्रेनची दुसरी यात्रा पुण्याहून सुरू झाली असून, मानसखंड एक्स्प्रेस २२ मे २०२४ रोजी उत्तराखंडसाठी रवाना झाली आहे. मानसखंड एक्स्प्रेस ट्रेन दुसऱ्या फेरीत २२ मे २०२४ रोजी सायंकाळी ७ वाजता पुण्याहून सुटली असून, यामध्ये ३०२ पर्यटकांनी सहभाग घेतला आहे. पुण्याहून सुटल्यानंतर लोणावळा, कल्याण, वसई, वापी, सुरत, रतलाम, उज्जैन या मार्गाने २४ मे २०२४ रोजी उत्तराखंड येथील टनकपूर रेल्वे स्थानकावर मानसखंड एक्स्प्रेस पोहोचेल.
IRCTC सर्व पर्यटकांना उत्तराखंडमधील कुमाऊं भागातील प्रमुख आणि अल्पपरिचित पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी पॅकेज म्हणून हॉटेल, बस, टॅक्सी आदींची व्यवस्था करेल. या सेवेसाठी आयआरसीटीसीकडून २८,०२० रुपयांपासून पॅकेज सुरू होत आहेत.
प्राचीन भारतीय ग्रंथांनुसार, उत्तराखंडचा कुमाऊं प्रदेश मानसखंड नावाने ओळखला जातो. उत्तराखंड पर्यटन विकास परिषद आणि IRCTC यांच्या संयुक्त विद्यमाने उत्तराखंडच्या कुमाऊं क्षेत्रात पर्यटनाला चालना देण्यासाठी मनसखंड एक्स्प्रेस नावाची एक विशेष पर्यटक ट्रेन सुरू करण्यात आली आहे. या यात्रा ट्रेनची पहिली फेरी २२ एप्रिल २०२४ रोजी यशस्वीरित्या चालवली गेली. यामध्ये २८० पर्यटकांनी सहभाग घेतला होता.
या ट्रेनच्या पहिल्या यात्रेच्या यशस्वी संचालनानंतर आता दुसरी यात्रा फेरी ३०२ पर्यटकांसह २२ मे २०२४ रोजी पुण्याहून रवाना झाली. ही मानसखंड एक्स्प्रेस २४ मे २०२४ रोजी उत्तराखंड येथील टनकपूर येथे पोहोचेल. या यात्रेत सहभागी झालेल्या पर्यटक प्रवाशांचे रेल्वे स्थानकावर मराठी परंपरेप्रमाणे स्वागत करण्यात आले. पारंपारिक पद्धतीने आरती करण्यात आली. ढोल-ताशांच्या गजरात पर्यटकांचे स्वागत करण्यात आले. तिलक लावून फुलांची उधळण करण्यात आली. या यात्रेबाबत पर्यटक खूप उत्सुक दिसले. या टूर पॅकेजच्या माध्यमातून उत्तराखंडमधील काही नवीन पर्यटन स्थळे पाहायला मिळतील, अशी आशा पर्यटकांनी व्यक्त केली.
१० रात्री/११ दिवसांच्या या प्रवासात सर्व पर्यटकांना कुमाऊँ प्रांतातील पूर्णागिरी मंदिर, हातकालिका मंदिर, कासार देवी, कातरमाळ, कैंचीधाम, चित्तई गोलू मंदिर, जागेश्वर धाम, शारदा घाट, पाताळ भुवनेश्वर मंदिर अशा विविध पर्यटन स्थळांना भेट देता येणार आहे. प्रशिक्षित मार्गदर्शकांद्वारे, नानकमत्ता गुरुद्वारा, भीमताल, नैनिताल, अल्मोडा, चाकोरी, चंपावत टी-गार्डन, बालेश्वर मंदिर, मायावती आश्रम आदी ठिकाणीही भेट दिली जाईल. याशिवाय, ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांना पहाडी पदार्थाची रुचकर चव चाखता येईल.
या मानसखंड एक्स्प्रेसला तृतीय श्रेणी वातानुकुलित डबे जोडण्यात आले आहेत. पर्यटकांच्या सोयीसाठी ट्रेनच्या एका डब्यात फक्त चार बर्थ बुक करण्यात आले आहेत. उत्तराखंडचा समृद्ध नैसर्गिक, सांस्कृतिक, स्थापत्य आणि आध्यात्मिक वारसा ट्रेनच्या बाहेर रेखाटण्यात आता आहे. पँट्री कारच्या कोचमध्ये उत्तराखंड येथील विविध खाद्यपदार्थांचे चित्रण करण्यात आले आहे. एका कोचमध्ये विविध लोक उत्सवांचे चित्रण गेले आहे. तर दुसऱ्या कोचमध्ये राज्यातील विविध पोशाख परिधान केलेल्या लोक आहेत. डब्यांवर विविध मंदिरे आणि इतर महत्त्वाची ठिकाणे चित्रित करण्यात आली आहेत.
या ट्रेनमध्ये वातानुकूलित पॅन्ट्री कार आहे. या प्रवासादरम्यान पर्यटकांना उत्तराखंडच्या खाद्यपदार्थांसह विविध चविष्ट पदार्थ खाण्यास दिले जाणार आहेत. टनकपूर येथे उतरल्यानंतर पर्यटकांना विविध ठिकाणांना भेटी देण्यासाठी नेले जाईल. जेथे ते हॉटेल होमस्टेमध्ये राहतील. प्रवासादरम्यान, टनकपूर, चंपावत लोहघाट, चाकोरी, अल्मोडा आणि भीमताल येथे रात्रीच्या मुक्कामासह पर्यटक विविध ठिकाणी भेट देतील.
उत्तराखंड पर्यटन विकास परिषदेचे पर्यटन सचिव आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन कुर्वे यांनी सांगितले की, पहिल्या टप्प्यात चालवण्यात आलेल्या मानसखंड एक्स्प्रेसचे प्रचंड यश आणि पर्यटकांचा उत्साह पाहता, विभागाद्वारे मानसखंड एक्स्प्रेस पुणे येथून चालवण्याची योजना आखली गेली. दुसरा टप्पा तयार करण्यात आला. उत्तराखंड टुरिझम डेव्हलपमेंट कौन्सिलचा हा अनोखा उपक्रम भारतातील अशा प्रकारचा पहिलाच उपक्रम आहे. यामध्ये टुरिस्ट ट्रेनच्या माध्यमातून कमी माहिती असलेल्या ठिकाणी पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.