श्री कार्तिक स्वामी मंदिर, बद्रीनाथला जायचेय? आता मुंबईतून ट्रेन सुरू; पाहा, सविस्तर माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2024 06:20 PM2024-10-03T18:20:24+5:302024-10-03T18:22:35+5:30

Shree Kartik Swami Express: प्रमुख स्थळांमध्ये ऋषिकेश, केदारनाथ (हेलिकॉप्टरने), श्री कार्तिक स्वामी मंदिर आणि बद्रीनाथ यांचा समावेश होतो.

shree kartik swami badri kedarnath express departs from mumbai to uttarakhand | श्री कार्तिक स्वामी मंदिर, बद्रीनाथला जायचेय? आता मुंबईतून ट्रेन सुरू; पाहा, सविस्तर माहिती

श्री कार्तिक स्वामी मंदिर, बद्रीनाथला जायचेय? आता मुंबईतून ट्रेन सुरू; पाहा, सविस्तर माहिती

Shree Kartik Swami Express: ०३ ऑक्टोबर २०२४ रोजी मुंबईहून श्री कार्तिक स्वामी मंदिर आणि उत्तराखंडच्या पवित्र स्थळांचे दर्शन घेण्यास प्रवाशांच्या सोयीसाठी श्री कार्तिक स्वामी बद्रीकेदार एक्स्प्रेस सुरू झाली आहे. ही ट्रेन ०५ ऑक्टोबर २०२४ रोजी २७० विशेष प्रवासी पाहुण्यांना घेऊन योगनगरी ऋषिकेश स्थानकावर पोहोचेल. 

प्रवासाचा एकूण कालावधी ११ दिवस आणि १० रात्रींचा असणार आहे, ज्यामध्ये प्रवाशांना उत्तराखंडमधील महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांना भेट देण्यासाठी नेले जाईल. उत्तराखंड पर्यटन विकास परिषदेने इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन म्हणजेच IRCTC च्या सहकार्याने ही सेवा सुरू करण्यात आली आहे. महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातील प्रवासी, भाविक या यात्रेत सहभागी होऊ शकतात. याततील प्रमुख स्थळांमध्ये ऋषिकेश, केदारनाथ (हेलिकॉप्टरने), श्री कार्तिक स्वामी मंदिर आणि बद्रीनाथ यांचा समावेश होतो.

भगवान कार्तिकेय स्वामींचे एकमेव मंदिर

उत्तर भारतातील भगवान कार्तिकेय स्वामींचे एकमेव मंदिर असलेल्या श्री कार्तिकेय स्वामी मंदिराचा उल्लेख स्कंद पुराणातही आहे. हे पवित्र स्थान उत्तराखंडच्या रुद्रप्रयाग जिल्ह्यातील कनकचोरी गावात क्रौंच पर्वतावर आहे, जे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व असलेले ठिकाण आहे. या ट्रेनमध्ये एकूण १४ डबे आहेत, ज्यात ३ एसी, १० गेस्ट कोच, १ आधुनिक एसी किचन कार आणि २ जनरेटर डबे आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी, प्रत्येक डब्यात फक्त चार बर्थ बुक केले जात आहेत. वरचे बर्थ दिलेले नाहीत. याव्यतिरिक्त, उत्तराखंडमधील पाककृती आणि इतर लोकप्रिय भारतीय पदार्थ एसी किचन कारद्वारे दिले जातील.

दरम्यान, मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी ही एक्स्प्रेस सुरू करण्याच्या निर्णयाचे स्वागत करताना आनंद व्यक्त केला. विविध राज्यातून आलेल्या पाहुण्यांचे मनापासून स्वागत केले. ते म्हणाले की, उत्तराखंड सरकार राज्यातील धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि आसपासच्या गावांमध्ये पर्यटन सुविधा विकसित करण्यासाठी कटिबद्ध आहे. पर्यटन मंत्री सतपाल महाराज यांनी या विशेष ट्रेनद्वारे देशभरातील वैविध्यपूर्ण मेजवानी, सांस्कृतिक वारसा आणि उत्तराखंडमधील पर्यटन स्थळांना प्रोत्साहन देणाऱ्या या उपक्रमाचे कौतुक केले आहे.

 

Web Title: shree kartik swami badri kedarnath express departs from mumbai to uttarakhand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.