डेहरादून - अखेर गेल्या १६ दिवसांपासून सुरू असलेली मृत्यूशी झुंज यशस्वी झाली असून उत्तरकाशी येथील बोगद्यातील मजुरांपर्यंत एनडीआरएफ जवानांची टीम पोहोचली आहे. त्यामुळे, काही वेळातच बोगद्या अडकलेले मजूर सुखरुप बाहेर येणार आहेत. या मजुरांच्या स्वागतला राज्याच्या मुख्यमंत्र्यांपासून ते अनेक मान्यवर उपस्थित आहेत. तर, मजुरांचे कुटुंबही त्यांच्या मूळ गावाहून उत्तरकाशी येथील बोगद्याबाहेर आपल्या मुलांची, वडिलांची, भावाची आप्तेष्टांची कासावीस होऊन वाट पाहत आहेत. बोगद्यातील आपल्या मुलापर्यंत पोहोचण्यासाठी एका वडिलांनी चक्क पत्नीचे दागिने सोनाराकडे गहाण ठेऊन उत्तरकाशी गाठली.
बोगद्यात अडकलेल्या मजुरांच्या सुटकेकडे गेल्या १७ दिवसांपासून भारतासह अवघ्या जगाच्या नजरा लागल्या आहेत. बोगद्यात अडकलेल्या मुजरांचे नेमके काय झाले, ते सुखरुप आहेत का, असे अनेक प्रश्न कुटुंबीयांसह प्रशासन आणि बचाव पथकाला पडले होते. अखेर, एका कॅमेऱ्याद्वारे मजुरांशी संवाद साधल्यानंतर सर्वांचाच जीव भांड्यात पडला. त्यानंतर, युद्धपातळीवर या मजुरांना बोगद्यातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू झाले होते. या प्रयत्नांना अखेर यश आले असून एनडीआरएफची टीम तिथपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे, काही क्षणातच हे मजुर बोगद्यातून बाहेर येणार आहेत. बाहेर येताच आपल्या कुटुंबीयांना बिलगणार आहेत. कारण, मृत्यूच्या दाढेतून बाहेर येणं ते काय असतं हा थरार त्यांनी व त्यांच्या कुटुंबीयांना गेल्या १७ दिवसांपासून अनुभवला आहे.
सर्वजण रोजंदारी मजूर असल्याने अर्थातच त्यांची परिस्थिती बेताचीच. त्यामुळे, आपल्या लेकरांना भेटण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांनीही प्रयत्नांची पराकाष्टा केली आहे. उत्तरकाशी येथे येण्यासाठी पत्नीचे दागिने सोनाराकडे गहाण ठेऊन पैसे गोळा केले. ९ हजार रुपये घेऊन मी इथे आलो होतो, आता २९० रुपये शिल्लक राहिले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून इथे असल्याने हळू हळू पैसे खर्च होत आहेत, असे म्हणत बोगद्यात अडकलेल्या मजुराच्या वडिलांनी आपली व्यथा माध्यमांसमोर मांडली.
बोगद्यातून बाहेर काढल्यानंतर डेहरादून येथे सर्वांना नेण्यात येणार आहे. तिथे गंगास्नान करुन त्यांना पुढील ठिकाणी पाठवण्यात येईल. आज सकाळपासूनच हलकासा पाऊस पडत आहे. सर्व मजूर बाहेर येत असताना देवानेही आशीर्वाद दिल्याचा हा शुभशकून आहे. बोगद्यातून आमचा मुलगा बाहेर येईल आणि आमच्या जीवात जीव येईल, असे म्हणत मजुराच्या वडिलांनी मुलगा सुखरुप परत येत असल्याचा आनंद व्यक्त केला. तसेच, मुलाला वापर नेण्यासाठी त्याचे कपडे आणि आवश्यक सामानही घरुन आणलं असल्याचंही त्यांनी सांगितलं.
कुटुंबीय बोगद्याबाहेर, सर्वांचाच जीव भांड्यात पडला
बोगद्यात खोदाई संपली असून अडकलेल्य़ा ४१ मजुरांपर्यंत ८०० मीमी व्यासाचा पाईप टाकण्यात आले आहेत. या पाईपमधून एनडीआरएफची टीम मजुरांपर्यंत पोहोचली आहे. बोगद्यामध्ये अॅम्ब्युलन्स आणि डॉक्टरांना देखील बोलविण्यात आले आहे. सर्वच्या सर्व ४१ मजूर ठीक असावेत अशी प्रार्थना केली जात आहे. रेस्क्यू टीमने मजुरांच्या कुटुंबीयांना बोलावून त्यांचे कपडे आणि बॅग तयार ठेवण्यास सांगितले आहेत.