Chamoli Accident: गेल्या काही दिवसांपासून उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात पाऊस आणि पूरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. यातच आता जिल्ह्यातील अलकनंदा नदीच्या काठावर बुधवारी मोठा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. नमामी गंगे प्रकल्पाच्या ठिकाणी ट्रान्सफॉर्मरचा स्फोट झाल्याने करंट लागून 15 जणांचा मृत्यू झाला आहे.
मुसळधार पावसानंतर उत्तराखंडमधील चमोली, हरिद्वार, रुद्रप्रयागसह अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती कायम आहे. दरम्यान, बुधवारी चमोली येथे अलकनंदा नदीच्या काठावर ट्रान्सफॉर्मरचा स्फोट होऊन 15 जणांचा मृत्यू झाला, तर अनेकजण जखमी झाले. चमोलीचे एसपी परमेंद्र डोवाल यांनी या घटनेची माहिती दिली आहे. अपघातात अनेक जण जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. चमोलीच्या घटनेवर शोक व्यक्त करत मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले आहेत.
जखमींवर उपचार सुरू एसपींनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात जखमी झालेल्या सर्व लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या या सर्वांवर उपचार सुरू आहेत. उत्तराखंडचे अतिरिक्त पोलीस महासंचालक व्ही मुरगेशन यांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात पोलीस चौकीच्या प्रभारीसह पाच होमगार्डयाही मृत्यू झाला आहे. या अपघातामुळे संतप्त नागरिक ऊर्जा महामंडळावर निष्काळजीपणाचा आरोप करत आहेत. तसेच, महापालिकेवरही कारवाई करण्याची मागणी होत आहे. अपघातानंतर प्रकल्पाचे काम थांबवण्यात आले आहे.