उत्तरकाशी : १२ दिवसांपासून बोगद्यात अडकलेल्या ४१ मजुरांना बाहेर काढण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या बचावकार्याच्या मार्गात शुक्रवारीही अडथळ्यांचे अनेक डोंगर आले. विविध अडचणींमुळे पूर्णदिवस ड्रिलिंग ठप्प राहिले. सायंकाळी ड्रिलिंगचे काम सुरू होणे अपेक्षित होते, पण ते होऊ शकले नाही.
अधिकाऱ्यांनी शुक्रवारी दुपारी दावा केला होता की, तांत्रिक समस्यांचे निराकरण करण्यात आले आहे आणि ड्रिलिंग काही तासांत पुन्हा सुरू होईल, परंतु संध्याकाळपर्यंत कोणतीही घोषणा झाली नाही.मजुरांच्या सुटकेचा मार्ग तयार करण्यासाठी ड्रिलिंग मशिनने ढिगाऱ्यामध्ये ४८ मीटरपर्यंत ड्रिल केले आहे, तर लोखंडी पाइप ४६.८ मीटरपर्यंत ढकलण्यात आला आहे, अडकलेल्या कामगारांपर्यंत पोहोचण्यापूर्वी प्रत्येकी ६ मीटरचे दोन पाइप (व्यास ८०० मि.मी.) आत टाकायचे आहेत, असे एनएचआयडीसीएलचे व्यवस्थापकीय संचालक महमूद अहमद व राज्याचे नोडल अधिकारी नीरज खैरवाल यांनी सांगितले.