देवभूमीत भाजप ‘शतप्रतिशत’ची हॅट्ट्रिक साधणार? गेल्या दाेन निवडणुकांत काॅंग्रेसला एकही जागा नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2024 06:43 AM2024-03-27T06:43:57+5:302024-03-27T06:44:55+5:30
आता तिसऱ्यांदा भाजप ‘शतप्रतिशत’ची हॅट्ट्रिक साधणार का, की काँग्रेसप्रणीत इंडिया आघाडी मुसंडी मारणार, हे पाहावे लागणार आहे.
- संतोष सूर्यवंशी
डेहराडून : लोकसभा निवडणुकीच्या गेल्या दोन्ही पंचवार्षिकमध्ये भाजपने उत्तराखंडमध्ये ‘शतप्रतिशत भाजप’चा नारा बुलंद केला आहे. उत्तराखंडमध्ये २०१४ व २०१९च्या दोन्ही लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपनं येथील सर्वच्या सर्व पाचही जागा जिंकत प्रमुख विरोधीपक्ष असलेल्या काँग्रेसचा सुपडा साफ केला होता. आता तिसऱ्यांदा भाजप ‘शतप्रतिशत’ची हॅट्ट्रिक साधणार का, की काँग्रेसप्रणीत इंडिया आघाडी मुसंडी मारणार, हे पाहावे लागणार आहे.
बद्रीनाथ, केदारनाथ अशा पवित्र धामांमुळे देवभूमी असे बिरुद मिरवणारे राज्य म्हणजे उत्तराखंड. येथे लोकसभेच्या गेल्या दोन निवडणुकांमध्ये भाजपनं काँग्रेसला डोक वर काढू दिलेलं नाही. लोकसभेच्या पाच जागांपैकी दोन जागा नैनिताल-उधम सिंगनगर व अल्मोरा हे कुमाऊं प्रदेशात, तर, उर्वरित हरिद्वार, टेहरी गढवाल अन् गढवाल (पौरी) या जागा गढवाल प्रदेशात मोडतात.
काय होती २०१९ची स्थिती?
केंद्रीय पर्यटन आणि संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट यांनी २०१९च्या लोकसभा निवडणुकीत नैनिताल-उधम सिंगनगर या मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांचा तब्बल ३ लाख ३९ हजार ९६ मतांनी पराभव केला होता.
अल्मोरा लोकसभा मतदारसंघात भाजपचे अजय टमटा त्यांनी काँग्रेसच्या प्रदीप टमटा यांचा दोन लाख ३२ हजार ९८६ मतांनी पराभव केला होता.
गढवाल (पौरी) मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री तीर्थसिंग रावत यांनी काँग्रेसच्या मनीष खंडुरी यांचा ३ लाख २ हजार ६६९ मतांनी पराभव केला होता.
टिहरी लोकसभा मतदारसंघातून माला राज्य लक्ष्मी शाह यांनी २०१९ मध्ये सलग तिसऱ्यांदा काँग्रेसच्या प्रीतम सिंग यांचा ३ लाख ५८६ मतांनी पराभव केला होता, तर माजी मुख्यमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी हरिद्वारमध्ये काँग्रेसच्या अंबरीश कुमार यांचा २ लाख ५८ हजार ७२९ मतांनी पराभव केला होता. पोखरियाल यांचा २०१९मध्ये या जागेवरून सलग दुसरा विजय होता. त्यांनी २०१४ मध्ये हरीश रावत यांच्या पत्नी रेणुका रावत यांचा १ लाख ७७ हजार ८२२ मतांनी पराभव केला होता.