श्रेया केने वर्धासर्व शिक्षा अभियानात इयत्ता पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांना गणवेश व पाठ्यपुस्तके दिली जातात. यात गणवेशास्तव १ कोटी ८३ लाखांच्या निधीचा प्रस्ताव आहे. यात ४५ हजार विद्यार्थ्यांना गणवेश दिले जाणार आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यानंतर या निधीचे वितरण होणार असल्याचे शिक्षण विभागाद्वारे सांगण्यात आले. यामुळे शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश मिळतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. जि.प. व न.प. शाळेतील मुलांना पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले आहे; पण अद्याप स्वाध्याय पुस्तिका वितरित केल्या नाहीत. स्वाध्याय पुस्तिका मुद्रीत व्हायच्या असल्याने प्राथमिक शिक्षण विभागाला त्या अद्याप अप्राप्त आहेत. तालुकानिहाय स्वाध्याय पुस्तिका व पाठ्यपुस्तकांचे वितरण केले जातेल पण स्वाध्याय पुस्तिका आल्या नसल्याने इयत्ता सहावी ते आठवीतील मुले यापासून वंचित होते. सर्वशिक्षा अभियानांतर्गत सर्व मुलींना मोफत गणवेश व पाठ्युपुस्तके देण्याची तरतूद आहे; पण मागास प्रवर्गात न मोडणाऱ्या मुलांना या योजनेचा लाभ मिळत नाही. सर्व मुलांना शिक्षण घेता यावे, यासाठी शासनाने ही योजना सुरू केली आहे; पण योजनेतील अटींमुळे गरजू विद्यार्थी वंचित राहत असल्याचे दिसते. यातून निर्माण होणारा भेद मिटविण्यासाठी सर्वांना समान न्याय देणे गरजेचे झाले आहे.
शालेय गणवेशांकरिता १ कोटी ८३ लाख रुपयांचा निधी
By admin | Published: June 01, 2015 2:26 AM