प्रफुल्ल लुंगे लोकमत न्यूज नेटवर्क सेलू : शहराला लागूनच तुळजापूर- नागपूर महामार्ग व थोड्याच अंतरावरून समृद्धी महामार्ग गेल्याने सेलू शहराच्या वैभवात भर पडली आहे. शहरालगतच्या शेतीचे भाव आकाशाला भिडले असून प्रतिएकरी जवळपास एक कोटी रुपयांचा भाव मिळू लागला आहे. त्यामुळे येथील शेतीला आणि शेतकऱ्यांनाही 'अच्छे दिन' आलेले दिसून येत आहे.
मागील दोन वर्षांपूर्वी ८० ते ८५ लाख रुपये एकरप्रमाणे काही व्यवहारही झालेले आहेत. शहरालगत विकाऊ शेती कमी असल्याने महामार्गालगतच्या शेतीचे भाव चांगलाच भाव खाऊ लागले आहे. सेलू शहराच्या आजूबाजूला सर्व प्रमुख मार्गांनी ले-आऊट टाकण्यात आले आहे. मोठ्या प्रमाणात कृषक जमीन व कृषक करून प्लॉट विक्री ही सुरू आहे. शहराच्या परिसरात ले-आऊट पडल्याने आता मूळ वस्तीपासून दूरपर्यंत सेलू शहर विस्तारत आहेत.
कोणत्या भागात एकरी काय दर?नागपूर-तुळजापूर मार्गावर : नागपूर-तुळजापूर महामार्गावर शेतीचे भाव चांगले कडाडले आहे. सेलू शहरालगत एक कोटी रुपये प्रतिएकर भाव आहे. थोडे दूर गेले तर ७५ लाखांपर्यंत प्रतिएकर जमीन विकल्या जात आहेत.
सेलू-सुकळी स्टेशन मार्ग : सेलू शहर ते सुकळी स्टेशन मार्गाला क्रॉस करून समृद्धी महामार्गहीँ गेला आहे. या रस्त्याने एमआयडीसी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. हिंगणा, हिंगणी, सेलू मार्गे मदनी असा महामार्ग विकसित झाल्याने या रस्त्यावर एक कोटी रुपये भाव जमिनीला मिळत आहे
सेलू-वडगाव मार्ग : या मार्गावर सेलू शहरापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरापर्यंत ले-आऊट विकसित झाले आहे. तसेच सेलू-रेहकी मार्गही चांगलाच भाव खात असून ६० ते ८० लाख रुपये एकर जमीन विकल्या जात आहे. मात्र, प्लॉट घेणाऱ्या ग्राहकांची संख्या थोडी कमी आहे.
व्यावसायिकांत स्पर्धाशहराला लागून समृद्धी माहमार्ग गेला. नागपूर-तुळजापूर महामार्गही विकसित आल्याने जमिनीचे दर वाढले आहेत. आजूबाजूच्या गावांतही जमिनींचे दर वाढले असून ले-आऊट विकसित करून विकणाऱ्यांची स्पर्धा निर्माण झाली आहे.
व्यावसायिकांच्या खिळल्या नजरा... तालुक्यात बोरधरण व बोरव्याघ्र प्रकल्प आहे. तेथे पर्यटकांची गर्दी असते. जंगल सफारीसाठी दूरवरून प पर्यटक येथे येतात. यामुळे हॉटेल, लॉज, रेस्टॉरंट वाढले आहेत. व्यावसायिक लोकांच्या नजरा येथील वाढत्या पर्यटनाकडे लागल्याने जमिनीचे दर येथेही गगनाला भिडले आहेत. त्यामुळे या परिसरात ले-आऊटही वाढले आहेत.
माजी सरपंच काय म्हणतात..."तालुक्यातून समृद्धी महामार्ग, नागपूर-तुळजापूर महामार्ग गेल्याने जमिनी अधिग्रहित केल्या. त्यामुळे या परिसरातील जमिनींना मोठे महत्त्व आल्याने जमिनीचा भाव एक कोटीवर गेला आहे."- जयश्री शंकदवार, माजी सरपंच, धानोली (मेघे).
"तालुका सिंचनात सुजलाम् सुफलाम् आहे. पूर्वीच जमिनीचे दर जास्त होते. तुळजापूर-नागपूर महामार्गाचे नूतनीकरण व समृद्धी महामार्ग गेल्याने भाव आकाशाला भिडले." - पिंटू सोमनाथे, माजी सरपंच