दिलीप चव्हाण ल्ल सेवाग्रामजागतिक स्तरावरील प्रसिद्ध असलेल्या येथील महात्मा गांधी आश्रमला या आर्थिक वर्षात १ लाख ३६ हजार १३ पर्यटकांनी भेट दिल्याची नोंद येथील अभिप्राय पुस्तिकेत झाली आहे. या व्यतिरिक्त अनेक पर्यटक येथे नोंद न करता भेट देवून गेल्यचेही वास्तव आहे. सत्य आणि अहिंसा या तत्वांने महात्मा गांधी यांनी देशाला दिशा दिली. त्यांच्या याच तत्वाची आज पुन्हा विश्वाला गरज असल्याच्या प्रतिक्रीया येथे येणाऱ्या अभ्यासकांसह पर्यटकांनी दिल्याचे दिसून आले आहे. दक्षिण आफ्रिकेनंतर भारतात महात्मा गांधी यांनी वेगवेगळे सत्याग्रह केले. स्वातंत्र्य आणि रचनात्मक कार्यक्रमाची दिशा याच सेवाग्राम आश्रमातून ठरविल्या गेली. गांधीजीचे दहा वर्षांचे वास्तव्य सेवाग्राम आश्रमात होते. यामुळे या आश्रमाचे महत्त्व काही औरच आहे. यामुळे आश्रमातून झालेली कामे आणि बैठकांची माहिती येथील साधकांकडून पर्यटक घेताना दिसतात. सदर आश्रम राष्ट्रीय धरोहर असल्याने वास्तू व वातावरण प्रेरणादायी आहे. आश्रम व स्मारक प्रत्यक्ष पाहण्यासाठी आणि तो नवीन पिढीने पाहावा या उद्देशाने येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या दरवर्षाला वाढत आहे. एप्रिल २०१५ ते मार्च २०१६ या आर्थिक वर्षात १ लाख ३६ हजार १३ इतकी संख्या नोंदविण्यात आलेली आहे. यात सर्वात कमी नोंद गत मे महिन्यात झाली. ही नोंद ६ हजार २७० होती. सर्वात जास्त नोंद जानेवारी महिन्यात झाली. ती २१ हजार २७१ इतकी आहे. विदेशी अभ्यासकांची गर्दी ४महात्मा गांधी एक व्यक्ती नसून ते विचार आहे. आणि विचार प्रत्येकालाच हवे असतात, हे येथे येणाऱ्या विदेशी अभ्यासकांच्या गर्दीने दिसून आले आहे. आश्रमात महात्मा गांधी यांच्या विचाराची शिदोरी नेण्याकरिता येथे अनेक जण येऊन गेल्याची नोंद झाली आहे. तर अनेक आंदोलनाची सुरुवात याच आश्रमाच्या भूमीतून झाल्याची नोंदही यंदाच्या वर्षात झाली.
बापूकुटीला १ लाख ३६ हजार पर्यटकांची भेट
By admin | Published: April 04, 2016 5:19 AM