वर्धा : जिल्ह्यात गत महिन्यापासून डेंग्यूने चांलेच थैमान घातले आहे. या रोगावर प्रतिबंध लावण्याकरिता जिल्हा प्रशासनाकडून प्रयत्न सुरू असून त्यांच्याकडून स्वच्छता राखण्याच्या सूचना करण्यात येत आहे. जिल्ह्यात झालेल्या सर्वेनुसार सुरू आठवड्यात एकूण १० रुग्ण आढळल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यात जानेवारी महिन्यापासून आतापर्यंत एकूण १४४ रुग्णांची नोंद झाली आहे. पुलगाव, हिंगणघाट शहराला हादरा देणाऱ्या या रोगाने आष्टी (शहीद) तालुक्यातील नरसापूर येथे हल्ला चढविला आहे. या रोगावर प्रतिबंध लावण्याकरिता विविध उपाययोजना सुरू आहेत. या रोगामुळे जिल्ह्यात आतापर्यंत एकूण आठ जणांचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. यापैकी एकाचा मृत्यू डेंग्यूने झाल्याचे स्पष्ट झले आहे. इतर मृत्यू याच रोगाने झाले अथवा अन्य कारणाने झाला याचा खुलासा झाला नाही. या रोगामुळे मृत्यू झाल्याचा खुलासा करणाऱ्या कमिटीची सभा ३० सप्टेंबर रोजी नागपूर येथे झाल्याची माहिती आरोग्य विभागाच्यावतीने देण्यात आली आहे. या कमिटीचा अहवाल अद्याप जिल्ह्याला प्राप्त झाला नाही. यामुळे डेंग्यूने किती जणांचा मृत्यू झाला याचा खुलासा अद्याप झाला नसल्याचे सांगण्यात आले आहे.(प्रतिनिधी)
आठवडाभरात आढळले १० डेंग्यू रुग्ण
By admin | Published: October 07, 2014 11:38 PM