राजेश सोळंकीदेऊरवाडा/आर्वी (जि. वर्धा) : समुद्रसपाटीपासून तब्बल २६६५ मीटर उंचीवर हाडे गोठवणाऱ्या थंडीत कारगीलमध्ये ‘ती’ने तब्बल दहा वर्षे सेवा बजावली. आता ‘ती’ लडाखमधील भारत-चीन सीमेवर सहकाऱ्यांच्या मदतीने दहा हजार फूट उंच पर्वतांवर वळण रस्ते, बोगदे बांधणार आहे. वैशाली सुरेशचंद्र हिवसे असं तिचं नाव. बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनच्या (बीआरओ) रोड कन्स्ट्रक्शन कंपनीची (आरसीसी) पहिली महिला कमांडिंग ऑफिसर म्हणून तिची नियुक्ती झाली आहे.
वर्धा जिल्ह्यातील आर्वी या तालुक्याच्या गावातील मूळ रहिवासी असलेली वैशाली या अत्यंत जोखमीच्या कामासाठी निवडली गेल्याने महाराष्ट्राची मान गर्वानं उंचावली गेली आहे. त्यांनी कारगील येथे दहा वर्षे आव्हानात्मक परिस्थितीत काम केले. त्याची दखल घेत ‘बीआरओ’ने त्यांना ही जोखमीची कामगिरी सोपवली आहे. बुधवारी बीआरओने ट्विट करून ही आनंदाची बातमी दिली.
आर्वी येथे बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यावर वैशाली हिवसे यांनी सेवाग्राम येथील बापूराव देशमुख अभियांत्रिकी महाविद्यालयात स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी घेतली. त्यानंतर नागपूर येथे रामदेवबाबा कॉलेजमध्ये एम. टेक पूर्ण करून यूपीएससीची परीक्षा दिली. त्यांची दहा वर्षापूर्वी सैन्य दलांतर्गत येणाऱ्या बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनमध्ये निवड झाली.
अशी आहेत नवी आव्हाने
मागील वर्षी बीआरओने बोगदा मार्गाची निर्मिती केली. जगात कोविडचे थैमान असताना लडाखमधील चिनी सीमेवर रस्त्याचे काम केले. सध्या लडाख-जम्मू-काश्मीर-उत्तरांचल, हिमालय प्रदेश, अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम या प्रांतात बीआरओचे नियोजित मार्गांचे काम सुरू आहे.
६१ रस्त्यांच्या सुनियोजित कामाचे चीन सीमेवरील हे काम डिसेंबर २०२२ मध्ये बीआरओ पूर्ण करणार आहे. दहा हजार फूट उंचीवर, वाकड्या-तिकड्या पर्वतांमधून मार्ग काढत रस्ते जोडावे लागणार आहेत. बोगदे, पूल यांची निर्मिती करावी लागणार आहे. हे काम प्रचंड चिकाटीचे आणि आव्हानात्मक आहे.
जाेखमीची कामगिरी
भारत-चीन सीमेवर सध्या रस्ता बांधकाम सुरू आहे. त्याचा पूर्ण कार्यभार व देखरेख वैशाली यांच्याकडे असेल. त्यांनी कारगील येथे दहा वर्षे आव्हानात्मक परिस्थितीत काम केले. त्याची दखल घेत ‘बीआरओ’ने त्यांना ही जोखमीची कामगिरी सोपवली आहे. बुधवारी बीआरओने ट्विट करून ही आनंदाची बातमी दिली.
उच्चशिक्षित कुटुंब
आई मॉडेल हायस्कूल वाठोडा येथे मुख्याध्यापिका, तर वडील कला व वाणिज्य महाविद्यालयात शारीरिक शिक्षक होते. मोठा भाऊ डॉ. सचिन हिवसे आर्वीला बालरोगतज्ज्ञ आहे. लहान बहीण नागपूरला उच्च न्यायालयात वकील आहे. वैशाली हिवसे या कार्यकारी अभियंता आहेत.