लोकमत न्यूज नेटवर्कपुलगाव : शहराच्या मुख्य मार्ग व चौकात असलेल्या धर्मशाळेचे बांधकाम जवळपास १०० वर्षे जुने असून रेती, चुना आणि विटांचे आहे. या धर्मशाळेचा वाद बऱ्याच वर्षांपासून सुरू असून सध्या राज्य शासनाच्या ताब्यात आहे. मागील संततधार पावसामुळे या धर्मशाळेच्या पश्चिम भागातील भिंतीचा काही भाग नजीकच्या केशरवानी शौचालय व धर्मशाळेजवळच्या नालीत पडल्यामुळे काही प्रमाणात नुकसान झाले. बांधकामाचा मलबा नालीत पडल्यामुळे सांडपाण्याचा निचरा होत नाही. नगर प्रशासन व नायब तहसीलदार यांना मलबा त्वरित उचलण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.शहर व परिसरात संततधार पाऊस असून यामुळे ८ सप्टेंबरला गांधी चौकालगतच्या धर्मशाळेच्या इमारतीची पश्चिम भागातील भिंत पडली. १०० वर्षे जुन्या या भव्य अशा धर्मशाळेचा मागील कित्येक वर्षे वाद चालला. सध्या ती शासनाच्या ताब्यात आहे. या बेवारस धर्मशाळेत अनेकांनी ताबा मिळवून दुकाने थाटली आहे. काही वर्षांपूर्वी धर्मशाळेच्या उत्तरेकडील दर्शनीय भाग खचल्यामुळे तेथे असलेले नायब तहसीलदार कार्यालय तेथून दुसरीकडे स्थानांतरित करावे लागले. ही धर्मशाळा शासनाने पालिकेला द्यावी, पालिका या जागेवर व्यापार संकुल बांधून उत्पन्नासोबतच बेरोजगारांना लहान मोठा व्यापार करण्याची संधी देईल, या भावनेतून भाजप ओबीसी मोर्चाचे प्रांतीय सरचिटणीस व भाजप जिल्हा सचिव नितीन बडगे यांनी मागणी केली. त्यांना यात यश आले. परंतु, घोडे कुठे अडले हे समजायला मार्ग नाही. १०० वर्षे जुनी ही धर्मशाळा कोसळून वित व प्राणहानी होण्याची शक्यता धर्मशाळेजवळ राहणारे गौरीशंकर केशरवानी यांनी व्यक्त केली आहे. भविष्यात होणारी दुर्घटना टाळण्यासाठी राज्य शासनाने ही धर्मशाळा पालिकेला हस्तांतरित करण्याची मागणी करण्यात आली आहे.
१०० वर्षे जुन्या धर्मशाळेची भिंत पडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2019 11:22 PM
मागील संततधार पावसामुळे या धर्मशाळेच्या पश्चिम भागातील भिंतीचा काही भाग नजीकच्या केशरवानी शौचालय व धर्मशाळेजवळच्या नालीत पडल्यामुळे काही प्रमाणात नुकसान झाले. बांधकामाचा मलबा नालीत पडल्यामुळे सांडपाण्याचा निचरा होत नाही. नगर प्रशासन व नायब तहसीलदार यांना मलबा त्वरित उचलण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
ठळक मुद्देमलबा नालीत : पालिकेला देण्याची मागणी