अखेरच्या दिवशी गर्दी : गटांकरिता २५५ तर गणांकरिता ४५१ नामांकन वर्धा : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी नामांकन अर्ज सादर करण्यास २७ जानेवारीपासून प्रारंभ झाला. बुधवारी शेवटच्या दिवशी इच्छुकांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयात नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी केली होती. सायंकाळपर्यंत जिल्ह्यात गट आणि गणांकरिता १००० नामांकन दाखल करण्यात आले. यात वर्धा तालुक्यात एकूण २९४ नामांकन दाखल झाले असून गट व गणांची विभागणी रात्री उशीरापर्यंत सुरू होती. उर्वरित तालुक्यात जि.प. गटासाठी २५५ तर पं.स. गणांकरिता ४५१ नामांकन अर्ज दाखल झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. जिल्ह्यात ५२ गट आणि १०४ गणांकरिता निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता; पण वाठोडा गट व त्या अंतर्गत चार गणांच्या निवडणुकीसाठी नव्याने कार्यक्रम जाहीर करण्यात येणार आहे. यामुळे ५० गट आणि १०० गणांकरिता निवडणूक घेण्यात येत आहे. यासाठी नामांकन अर्ज दाखल करण्याचा बुधवारी अखेरचा दिवस होता. मंगळवारी सर्व्हर डाऊन असल्याने अनेकांना आॅनलाईन माहिती सादर करताना व प्रिंट काढताना अडचणींचा सामना करावा लागला. परिणामी, रात्र जागून काढत अर्ज ‘फुलफिल’ करावा लागला. मंगळवारी रात्री बहुतांश राजकीय पक्षांचे आणि अपक्ष उमेदवारही संगणक केंद्रांमध्ये ताटकळत असल्याचे दिसून आले. आज अखेरच्या दिवशी नामांकन अर्ज दाखल करण्याकरिता इच्छुकांची गर्दी उसळल्याने सकाळपासून संगणक केंद्रांसह उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसील कार्यालयांत गर्दी झाल्याचे पाहावयास मिळाले. वर्धा तालुक्यात जिल्हा परिषदेकरिता बुधवारपर्यंत २९४ नामांकन अर्ज दाखल करण्यात आले. यात १४ गटांकरिता आणि २८ गणांकरिता किती नामांकन दाखल झाले, हे रात्री उशिरापर्यंत कळू शकले नाही. जिल्ह्यात सर्वाधिक गट वर्धा तालुक्यात असल्याने आणि सायंकाळी ५ वाजेपर्यंत सर्वच राजकीय पक्षांसह अपक्षांनीही उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरिता गर्दी केल्याने प्रशानाकडून रात्री उशीरापर्यंत अर्जांची विभागणी करण्यात येत आहे. एकूण जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या रणसंग्रामाकरिता जिल्ह्यातील १००० उमेदवारांनी शड्डू ठोकून मैदानात उडी घेतली आहे. गुरूवारी नामांकन अर्जांची छाणणी करून यादी प्रसिद्ध केली जाणार असून ७ फेबु्रवारीपर्यंत नामांकन मागे घेता येणार आहे.(कार्यालय प्रतिनिधी) अपुऱ्या वेळेमुळे सर्वांची गोची २७ जानेवारीपासून नामांकन अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला असला तरी ३१ जानेवारीपर्यंत बहुतांश उमेदवारांनी नामांकनच दाखल केले नव्हते. शिवाय राजकीय पक्षांनी अधिकृत उमेदवार वेळेवर जाहीर केले. यामुळे बुधवारीच नामांकनासाठी गर्दी झाली. यात वेळ कमी पडल्याने प्रशासन तसेच उमेदवारांचीही धावपळ झाली. म्हसाळा गणात काँग्रेस रिंगणातून बाहेर बुधवार हा नामांकन अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. ३ वाजेपर्यंतच प्रशासनाकडून नामांकन अर्ज स्वीकारण्यात आले. यात म्हसाळा गणासाठी काँगे्रसतर्फे पंकज काचोळे हे दुपारी ३ वाजून १० मिनिटांनी अर्ज दाखल करण्यास गेले असता निवडणूक निर्णय अधिकारी घनश्याम भूगावकर यांनी अर्ज घेण्यास नकार दिला. यानंतर शेखर शेंडे यांनी अर्ज घेण्यासाठी आग्रह केला; पण त्यांचाही प्रयत्न व्यर्थ ठरला.
गट, गणांकरिता जिल्ह्यात १००० अर्ज
By admin | Published: February 02, 2017 12:42 AM