लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : वर्धा शहरासह तब्बल २० गावांची पाणी समस्या सोडविण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या धाम नदीचे पुनर्जीवन करण्याचे काम जिल्हा प्रशासनाने हाती घेतले आहे. जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्थेच्या विशेष सहकार्याने हे काम सध्या युद्धपातळीवर पूर्णही केले जात असून मागील ७२ तासांत येळाकेळी येथील धाम नदीच्या पात्रातून सुमारे दहा हजार घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. येळाकेळी येथील बंधारा ते काचनूर या २६ कि.मी.च्या धाम नदीपात्रातून गाळ काढून धाम नदी पुनर्जीवन करण्याच्या कामाला जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली आहे तर पावसाळ्यापूर्वी येळाकेळी येथील बंधाऱ्यापासून सुमारे अर्धा कि.मी. अंतरापर्यंतचा धाम नदीपात्रातील गाळ काढण्याचे निश्चित करण्यात आले आहे. येळाकेळी येथील बंधारा परिसरात धाम नदीचे पात्र १२० मीटरचे असून या भागातून किमान २५ हजार घनमीटर गाळ काढणे अपेक्षित आहे. ते कामही सध्या युद्धपातळीवर पूर्ण केले जात आहे. सुमारे पाच पोकलॅन्डच्या सहाय्याने धाम नदीपात्रातून गाळ काढला जात आहे. मागील ७२ तासांत येळाकेळी येथील धाम नदीच्या पात्रातून सुमारे दहा हजार घनमीटर गाळ काढण्यात आला आहे तर उर्वरित काम झटपट पूर्ण कसे होईल, यासाठी विशेष प्रयत्न होत आहेत.
शेतकऱ्यांना मिळणार नि:शुल्क गाळ
नदीतील गाळ हा शेत जमिनीची पोत वाढविण्यासाठी उपयुक्त राहतो. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी धाम नदीतून काढण्यात येणारा गाळ शेतात टाकण्यासाठी घेऊन जावा. नदीपात्रातील गाळ नि:शुल्क देण्यात येणार असला तरी गाळ नेण्यासाठी लागणाऱ्या वाहनाची व्यवस्था शेतकऱ्यांला करावी लागणार आहे.
काचनूर ते येळाकेळी येथील बंधारा या २६ कि.मी.च्या धाम नदीच्या पात्रातून गाळ काढण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली आहे. पावसाळ्यापूर्वी किमान येळाकेळी बंधाऱ्यापासून १ कि.मी. अंतरापर्यंतचा नदीपात्रातील गाळ काढण्याचे निश्चित केले आहे. त्यासाठीच्या कामाला सुरुवातही झाली आहे.
- सुनील रहाणे, कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग, वर्धा.