लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात नवीन कोविडबाधित सापडण्याची गती मंदावली असली तरी डिसेंबरअखेरपर्यंत जिल्हा १०० टक्के ‘व्हॅक्सिनेट’ कसा करता येईल, यासाठी जिल्हा प्रशासनातील आरोग्य विभाग प्रयत्न करीत आहे. शुक्रवारी जिल्ह्याने लसीकरणाचा ९.५० लाखांचा उंबरठा ओलांडला असून, आतापर्यंत जिल्ह्यात तृतीयपंथींनी कोविड प्रतिबंधात्मक लसीचे १०६ डोस घेतल्याची नोंद घेण्यात आली आहे.जिल्ह्यात आतापर्यंत लाभार्थ्यांना कोविड प्रतिबंधात्मक लसीचे ९ लाख ५० हजार ८६९ डोस देण्यात आले आहेत. यात ४ लाख ७९ हजार ३८० पुरुष, तर ४ लाख ७१ हजार ३८३ महिला लाभार्थ्यांचा समावेश आहे. सध्याच्या कोरोना संकटात कोविड प्रतिबंधात्मक लस ही कोविड मृत्यू रोखण्यासाठी एकमेव खबरदारीचा प्रभाव उपाय असल्याने वर्धेकरांचा लसीकरण मोहिमेला स्वयंस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.शिवाय नजीकच्या केंद्रावर जाऊन प्रत्येक व्यक्तीने कोविड लस घ्यावी, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे.
सात दिवस राबविणार मिशन ‘कवच कुंडल’ अभियान- कोविड संसर्गाच्या तिसऱ्या लाटेला वेळीच ब्रेक लावण्यासह त्याचा प्रभाव कमी करण्यासाठी जिल्ह्यात ८ ते १४ ऑक्टोबर या सात दिवसांच्या काळात जि.प.च्या आरोग्य विभागाच्या वतीने जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागांत ‘मिशन कवच कुंडल’ अभियान राबविले जात आहे. आतापर्यंत कोविडची प्रतिबंधात्मक लस न घेतलेल्या व्यक्तींनी नजीकच्या केंद्रावर जाऊन कोरोनाची प्रतिबंधात्मक लस घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
जिल्ह्यात ७० हजार लससाठा - मिशन कवच कुंडल अभियान राबविताना जिल्ह्यात कुठेही लसीचा तुटवडा निर्माण होणार नाही, याची दक्षता घेण्यात आली आहे. जिल्ह्यात सद्य:स्थितीत कोविड लसीचे ७० हजार डोस असून, प्रत्येक केंद्रावर मुबलक लससाठा उपलब्ध करून देण्यात आला आहे.
जिल्हा १०० टक्के व्हॅक्सिनेट व्हावा या हेतूने जिल्ह्यात ‘मिशन कवच कुंडल’ अभियान राबविले जात आहे. या मोहिमेच्या यशस्वितेकरिता शिक्षण, महिला विकास, ग्रामविकास व महसूल विभागातील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचे सहकार्य घेतले जात आहे. नजीकच्या केंद्रावर जाऊन नागरिकांनी कोविडची लस घेऊन मिशन कवच कुंडल यशस्वी करावे. कवच कुंडल मोहिमेचा एक भाग म्हणून शनिवारी १०१ केंद्रांवरून लसीकरण होईल.- प्रेरणा देशभ्रतार, जिल्हाधिकारी, वर्धा
शुक्रवारपासून जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागांत ‘मिशन कवच कुंडल’ अभियान राबविले जात आहे. जिल्ह्यात सध्या कोविड लसीचे ७० हजार डोस असून येत्या काही दिवसांत जिल्ह्याला १ लाख २० हजार लससाठा मिळणार आहे. कोविड लस ही कोविड मृत्यू रोखण्यासाठी उपयुक्त असून, नागरिकांनीही नजीकच्या केंद्रावर जाऊन लस घ्यावी. कवच कुंडल अभियानादरम्यान जास्तीत जास्त लाभार्थ्यांना कोविड लस देण्याचा मानस आहे. - डॉ. प्रवीण वेदपाठक, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी, वर्धा.