सात दिवसांत अहवाल : कृषी विभागाची माहिती लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : बोगस बियाणे देत शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये म्हणून नॉन बिटी बियाण्यांचे ११७ नमूने तपासणीसाठी नागपूर येथील बीज परिक्षण प्रयोगशाळेत जि.प. कृषी विभागाकडून पाठविण्यात आले आहे. चाचणी अहवाल आल्यानंतर संबंधित वाण पेरणी योग्य की अयोग्य, हे स्पष्ट होणार आहे. हा अहवाल सात दिवसांत मिळणार असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली. पेरणीच्या विविध कंपन्यांचे बियाणे कृषी केंद्र व काही व्यापाऱ्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या माथी मारले जाते. मागील वर्षी नॉन बीटी बियाण्यांविरूद्ध बऱ्याच तक्रारी आल्या होत्या. यामुळे जि.प. कृषी विभागाने बियाण्यांच्या नमून्यांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला. खरीप हंगाम सुरू होताच विविध बनावट बियाण्यांचा कृषी बाजारपेठेत शिरकाव होतो. त्यातून शेतकऱ्यांच्या फसवणुकीच्या घटना घडतात. अनेकदा उधारीवर बियाण्यांची खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांना हे बियाणे थोपविले जाते. बियाण्यांची लागवड करताना शेतकरी एकरी ४५० ग्रॅम बीटी बियाण्यांची लागवड करतात. या वाणाच्या सरंक्षणाकरिता १२० गॅ्रम नॉन बीटी बियाण्यांची लागवड केली जाते. नॉन बीटी बियाण्यांच्या पाकिटात चक्क बीटी बियाणे दिल्याचा प्रकार उघडकीस आला होता. अशा स्थितीत नॉन बीटी बियाण्यांची तपासणी करण्याचा आदेश कृषी आयुक्तांनी दिला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील विविध ठिकाणांहून संकलित केलेले नॉन बीटी बियाण्यांचे ११७ नमूने जि.प. कृषी विभागाने तपासणीसाठी नागपूरला पाठविले. या बियाण्यांचा अहवाल सात दिवसांत येणार आहे. गुरूवारपासून रोहिणी नक्षत्र सुरू झाले. त्यातच पंधरवड्यानंतर मृग नक्षत्राची सुरूवात होत आहे. या हंगामात शेतकऱ्यांची बियाण्यांबाबत कुठलीही फसवणूक होऊ नये म्हणून दक्षता घेण्याचे नियोजन जि.प. जिल्हा कृषी अधिकारी खळीकर, बमनोटे आदींनी केले. भरारी पथकांची करडी नजर राहणार आहे.
बियाण्यांचे ११७ नमूने तपासणीकरिता रवाना
By admin | Published: May 28, 2017 12:31 AM