लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : शहरासह जिल्ह्यात गुन्हेगारी घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसून येत आहे. पोलीस विभागाकडून अनेक प्रकरणांतील गुन्हेगारांना पकडून त्यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या. मात्र, खून, अत्याचार, जबरी चोरी आदींसह विविध गंभीर गुन्ह्यांतील तब्बल १२४ आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार होण्यात यशस्वी झाले आहे. गेल्या वर्षात जिल्ह्यातील तब्बल १२४ आरोपी वॉन्टेड असल्याचे वर्धा पोलिसांच्या वेबसाईटवरून मिळालेल्या आकडेवारीनुसार लक्षात आले आहे. पोलीस विभागातील तपास पथकांना हे आरोपी अजूनही मिळाले नसल्याचे दिसून येत आहे. शहरात मागील काही वर्षात गुन्हेगारी टोळ्या सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. वर्चस्ववादातून टोळीयुद्धाच्या अनेक घटना घडल्या. अनेकांच्या रक्ताने जिल्हा रक्ताळला. जिल्ह्यात विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या गंभीर गुन्ह्यातील आरोपींना पोलिसांनी अटकही केली. मात्र, अनेक आरोपी पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वीही झाले. आणि ते आरोपी अजूनही पोलिसांना गवसले नसल्याची माहिती आहे. वर्धा जिल्ह्यात खून प्रकरणात वडनेर पोलीस ठाण्यांतर्गत १, वर्धा ६, सेलू पोलीस ठाण्यांतर्गत १, कारंजा १, सिंदी रेल्वे १, पुलगाव २, आष्टी १ तर समुद्रपूर पोलीस ठाण्यांतर्गत १ अशा १४ खुनाच्या घटनांतील आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. तर सेवाग्राम आणि सिंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रत्येकी एका आरोपीचा खुनाचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणात शोध सुरू आहे. अत्याचार प्रकरणात ३ आरोपी वॉन्टेड आहेत. जबरी चोरीच्या प्रकरणातील १० आरोपी अजूनही पोलिसांना गवसलेले नाहीत. घरफोडी प्रकरणातील ३ फसवणूक प्रकरणात २६ तर चोरीच्या प्रकरणातील २१ आरोपी पोलिसांना सापडलेले नसल्याची माहिती आहे.
वर्षभरात ३० गुन्हेगारांना केले तडीपार शहरात कायदा व सुव्यवस्था राहण्यासाठी जिल्ह्यातील ३० गुन्हेगारांना हद्दपार करण्यात आले. यामध्ये सिंदी रेल्वे येथील ३ दारूविक्रेत्यांना १ वर्षासाठी तडीपार करण्यात आले. तसेच शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ७ गुन्हेगारांना ४ महिन्यांसाठी हद्दपार करण्यात आले. तसेच इतर विविध गंभीर गुन्ह्यांतील आरोपींनाही तडीपार करण्यात आले. यामध्ये रामनगर हद्दीतील ३, वर्धा शहर हद्दीतील ४, देवळी हद्दीतील २, पुलगाव हद्दीतील ४, सावंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ४, सिंदी रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीतल २ अशा एकूण ३० गुन्हेगारांना वर्धा जिल्ह्यातून गेल्या वर्षभरात हद्दपार करण्यात आले आहे.
गंभीर गुन्ह्यातील नऊ आरोपी फरार... जिल्ह्यात हिंगणघाट पोलीस ठाण्यांतर्गत झालेल्या खुनाच्या घटनेत ३ आरोपी पोलिसांना गुंगारा देत फरार होण्यात यशस्वी झाले. वर्धा शहर हद्दीत झालेल्या दरोडा प्रकरणात १, तळेगाव येथील घरफोडी प्रकरणात १, चोरीच्या प्रकरणात १ तर इतर विविध गुन्ह्यात वर्ध्यातील ३ आरोपी गेल्या वर्षभरापासून फरार असल्याची माहिती आहे.
तपास पथकांना ‘बूस्टर’ची गरजशहरासह जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात गुन्हे शोध पथक, गुन्हे प्रगटीकरण पथकांची निर्मिती करण्यात आली आहे. या पथकांकडून वॉन्टेड असलेल्या तसेच गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपींचा शोध घेऊन त्यांना न्यायालयात हजर करण्याची जबाबदारी असते. मात्र, सध्या अनेक पोलीस ठाण्यातील डीबी पथके केवळ मलिदा लाटण्यातच धन्यता मानत असल्याचे चित्र आहे. तसेच डीबी पथके वसुली पथके बनल्याचे चित्र आहे. त्यामुळे वरिष्ठांनी जिल्ह्यातील डीबी पथकांना बूस्टर देण्याची गरज आहे.