आशुतोष सलील : पिण्याच्या पाण्याचा अपव्यय टाळावर्धा : जिल्ह्यातील मोठे, मध्यम व लघु प्रकल्पामध्ये ६९.९८ दशलक्ष घनमीटर पाणी म्हणजे १२.६९ टक्के पाणी उपलब्ध आहे. उन्हाळ्यामध्ये जिल्ह्यातील सर्व गावांना पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे आवश्यक सर्व उपाययोजना करण्यात आल्या असून जनतेनी पिण्याच्या पाण्याचा अपव्यय टाळावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी केले आहे.एप्रिल मे आणि जून या तीन महिन्यांसाठी पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पिण्याचे पाण्याची संभाव्य टंचाई निर्माण होणाऱ्या गावात ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत आवश्यक उपाययोजना लागू करण्यात आल्या असल्याची माहिती यावेळी जिल्हाधिकारी सलील यांनी दिली. जिल्ह्यातील बोर या मोठ्या सिंचन प्रकल्पात १५.०९ दशलक्ष घनमीटर जलसाठा म्हणजेच १२.१७ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. दहा मध्यम प्रकल्पामध्ये ४५.८९ दशलक्ष घनमीटर म्हणजे ११.८८ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. धाम प्रकल्पात २४.५४ टक्के, डोंगरगाव १८.७४ टक्के, मदन प्रकल्प ९.५८ टक्के, मदन उन्नई धरण १६.२९ टक्के, लालनाला १०.२० टक्के, वर्धा कार नदी प्रकल्प २४.८२ टक्के, निम्न वर्धा ९.५६ टक्के, पोथरा केवळ ०.६९ टक्के व पंचधारा प्रकल्पात उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध नाही. जिल्ह्यातील २१ लघु प्रकल्पामध्ये आज ६९.९८ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा उपलब्ध असून एकूण उपयुक्त पाणी साठ्याच्या २१.७४ टक्के आहे.(प्रतिनिधी)
सिंचन प्रकल्पात १२.६९ टक्के जलसाठा
By admin | Published: March 30, 2016 2:24 AM