वर्धा : ‘विद्यार्थ्यांना शिकू द्या अन् शिक्षकांना शिकवू द्या’ अशी हाक देत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने शिक्षक दिनी एकदिवसीय किरकोळ रजा आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनात जिल्ह्यातील १ हजार २७४ शिक्षक सहभागी होणार असून, शिक्षक दिनी गुरुजीविना शाळा अशीच परिस्थिती जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांत निर्माण होण्याची शक्यता आहे. तर शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी संघटनेच्या वतीने रेटण्यात येत असलेल्या मागण्या राज्यस्तरीय असल्याने शिक्षक दिनी पुकारण्यात आलेल्या आंदोलनात शिक्षकांनी सहभागी होऊ नये, असे आवाहन केले आहे.
जर आंदोलनकर्ते शिक्षक आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्यास कुठलीही शाळा बंद राहणार नाही, या हेतूने शिक्षण विभागाने बी प्लॅन तयार केला आहे. विशेष म्हणजे शिक्षक दिनी म्हणजेच ५ सप्टेंबरला आंदोलनकर्ते शिक्षक स्थानिक सिव्हिल लाइन भागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात एकत्र येत ‘विद्यार्थ्यांना शिकू द्या अन् शिक्षकांना शिकवू द्या’ ही मुख्य मागणी एक मुखाने रेटणार आहेत.
काय आहे शिक्षण विभागाचा बी प्लॅन?
शिक्षक दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषदेच्या सर्वच प्राथमिक शाळांची वेळ सकाळची करण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी एक पत्र निर्गमित करून रजेवर जाणाऱ्या शिक्षकांना सामूहिक रजेवर जाण्यापासून परावृत्त करण्यासाठी विशेष प्रयत्न करावे, अशा सूचना गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. जर आंदोलनकर्ते शिक्षक आपल्या भूमिकेवर ठाम राहिले तर इतर शाळेतील शिक्षकांना शिक्षक नसलेल्या शाळेत पाठवून शिक्षक दिनी शाळा सुरू ठेवण्यासाठी प्रयत्न होणार असल्याचे खात्रीदायक सूत्रांनी सांगितले.
मुख्याध्यापक अन् शिक्षकावर होणार जबाबदारी निश्चित
शिक्षक रजेवर गेल्यामुळे शाळा बंद राहिल्यास त्याची जबाबदारी संबंधित शाळा मुख्याध्यापक व शिक्षक यांच्यावर निश्चित करण्यात येणार आहे, ही बाब रजेवर जाणाऱ्या शिक्षकांच्या निदर्शनास आणून देण्यासह कोणतीही शाळा शिक्षकाविना राहणार नाही याची खबरदारी गटविकास अधिकाऱ्यांनी घ्यावी, असेही शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी निर्गमित केलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
या प्रमुख मागण्यांकडे वेधणार लक्ष
* शिक्षकांना विद्यार्थ्यांना शिकवू द्यावे, त्यांना अशैक्षणिक कामे करण्यास भाग पाडू नये.
* शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी.
* शिक्षकांना ग्रीष्मकालीन वाहतूक भत्ता देण्यात यावा.
* राज्यातील शिक्षकांची रिक्त पदे तातडीने भरण्यात यावी.
* शाळा स्तरावर कुठलीही सुविधा नसताना ऑनलाइन अशैक्षणिक कामे लादण्यात येऊ नये.
विविध मागण्यांसाठी ५ सप्टेंबर शिक्षक दिनी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने रजा आंदोलन पुकारण्यात आले आहे. शिक्षकांनी रजा आंदोलनात सहभागी होऊ नये, असे आवाहन आम्ही केले आहे. शिक्षक दिनी सकाळी शाळा भरणार असून, प्रत्येक शाळा सुरू राहावी, यासाठी शिक्षण विभाग प्रयत्न करीत आहे.
- डॉ. मंगेश घोगरे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जि. प. वर्धा.
अध्यापनापासून सातत्याने दूर ठेवणारी कामे बंद करावी आणि विद्यार्थी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळा व शिक्षकांच्या न्यायसंगत मागण्यांची सोडवणूक करण्याकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे. या उदासीन धोरणाचा निषेध शिक्षक दिनी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने रजा आंदोलनाच्या माध्यमातून केला जाणार आहे. वर्धा जिल्ह्यात १,२७४ पेक्षा अधिक शिक्षक सामूहिक किरकोळ रजा आंदोलनात सहभागी होतील. शिक्षक दिनाच्या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचा विरोध नाही. शिवाय कार्यक्रमावर बहिष्कार नाही.
- विजय कोंबे, राज्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती.