वर्धा : एखाद्या रस्त्यावर अपघात वाढले, की नागरिकांची मागणी म्हणून तेथे गतिरोधक बसविण्याचा उपाय केला जातो. मात्र, ८०० मीटरच्या रस्त्यावर १७ गतिरोधक असतील तर.., त्यांना स्पीड ब्रेकर म्हणावे की पाठ ब्रेकर हा प्रश्न आर्वीकरांपुढे निर्माण झाला आहे. आर्वीतील एका रस्त्यावरील गतिरोधकांमुळे नागरिकांचे हाल होत आहेत.
आर्वी नगरपालिकेच्या वतीने शहरातील रस्त्यावर अनावश्यक तयार करण्यात आलेल्या गतिरोधकामुळे नागरिक त्रस्त झाले असून, हे गतिरोधक तत्काळ काढण्यात यावेत, अशी मागणी तालुका पत्रकार संघटनेच्या वतीने प्रशासक असलेले उपविभागीय महसूल अधिकारी हरीश धार्मिक यांना निवेदनातून केली आहे.
शहरातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरापासून ते गुरुनानक धर्मशाळेपर्यंत ८०० मीटर अंतरावर सुमारे १४ स्पीड ब्रेकर लावले आहेत, तर न्यायालयापासून खुने यांच्या घरापर्यंत एक हजार मीटर अंतरावर १४ स्पीड ब्रेकर आहेत. नवीन स्पीड ब्रेकर लावले असतानाही जुने सिमेंटचे स्पीड ब्रेकर अजूनही कायम आहे.
वाहनांच्या वेगावर नियंत्रण प्राप्त करण्यासाठी गतिरोधक आवश्यक असले तरी लावताना त्यांचा अतिरेक झाला. कमी अंतरावर स्पीड ब्रेकर असल्यामुळे वाहनचालकाला पाठीचे, मणक्याचे व कमरेचे आजार होऊ शकतात, वाहनाचेसुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे अनावश्यक गतिरोधक हटविण्याची मागणी करण्यात आली. यावेळी धार्मिक यांनी संबंधितांना फोन करून सिमेंट काँक्रिटचे स्पीड ब्रेकर हटविण्यात यावे तसेच अनावश्यक गतिरोधकाची पाहणी करण्याचे आदेश दिले.
निवेदन देताना संघटनेचे अध्यक्ष सुशीलसिंग ठाकूर, उदय बाजपेयी, संजय पाटनी, अनिल जोशी, विजय अजमिरे, सूर्यप्रकाश भट्टड, दशरथ जाधव, पुरुषोत्तम नागपुरे, प्रा. अभय दर्भे, विजय जयस्वाल, संदीप जैन, गौरव कुऱ्हेकर, आदींसह संघटनेतील सदस्यांची उपस्थिती होती.