महेश सायखेडेलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोविड मृत्यू रोखण्यासाठी उपयुक्त ठरणारी कोरोना प्रतिबंधात्मक लस गरोदर महिला, स्तनदा माता, तसेच बेडरिडन व्यक्तींसाठीही पूर्णपणे सुरक्षित आहे. त्यामुळे जिल्ह्यातील गरोदर महिला, स्तनदा माता तसेच बेडरिडन लाभार्थ्यांनाही कोविडची प्रतिबंधात्मक लस दिली जात आहे. आतापर्यंत १ हजार ४८० गरोदर महिला, स्तनदा माता अन् बेडरिडन व्यक्तींना कोरोनाची प्रतिबंधात्मक लस देण्यात आली आहे, तर उर्वरित लाभार्थ्यांनी लवकरात लवकर कोरोनाची व्हॅक्सिन घेऊन स्वत:सह कुटुंबाला सुरक्षित करून घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.जिल्ह्यात १६ जानेवारीपासून कोविड लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत ५ लाख ७७ हजार ३६० व्यक्तींना लसीचा पहिला, तर १ लाख ९० हजार ५४६ लाभार्थ्यांना व्हॅक्सिनचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत. एकूणच जिल्ह्यात लसीकरण मोहिमेने ७.६७ लाखांचा टप्पा ओलांडला आहे. जिल्ह्यात सध्या केवळ दोन ॲक्टिव्ह कोविड बाधित असून जिल्ह्यात १०० टक्के लसीकरण झटपट व्हावे यासाठी जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांच्या मार्गदर्शनात आरोग्य विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी प्रयत्न करीत आहेत.
बेडरिडनला घरपोच दिली जातेय लसजिल्ह्यातील २ हजार २७० बेडरिडन व्यक्तींना कोविडची प्रतिबंधात्मक लस देण्याचे जिल्हा प्रशासनाने निश्चित केले आहे. या लाभार्थ्यांना आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी त्यांच्या घरी जाऊन कोविडची प्रतिबंधात्मक लस देत आहेत. आतापर्यंत ९०८ बेडरिडन व्यक्तींना कोविडची लस देण्यात आली आहे.
लाभार्थ्यांना देण्यात येणारी कोविड लस गरोदर महिला, स्तनदा माता तसेच बेडरिडन व्यक्तींसाठीही पूर्णपणे सुरक्षित आहे. त्यामुळे लाभार्थ्यांनी लसीबाबत कुठलीही शंका मनात ठेवू नये. शिवाय लस घेऊन स्वत:सह कुटुंबाला सुरक्षित करावे.- डॉ. प्रवीण वेदपाठक, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी, वर्धा.