विजय माहुरेलोकमत न्यूज नेटवर्कसेलू (घोराड) : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीचे गट व गण जाहीर होत प्रारूप रचना तयार करण्यात आली आहे. यामुळे सध्या ग्रामीण भागात हळूहळू हा होईना पण राजकीय वातावरण तापण्यास सुरूवात झाली आहे. ६० वर्षांत १५ व्यक्तींनी सेलू पंचायत समितीचे सभापतीपद भूषविले असून, यानंतर कोणाची वर्णी लागणार? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.सेलू तालुक्यातील राजकीय परिस्थिती दिवसागणिक बदलत आहे. राजकीय पक्ष आणि राजकीय गट तालुक्यात सक्षम आहेत. यावेळी होणारी निवडणूक सोपी व सहज कोणत्याही राजकीय नेत्याला घेता येणार नाही, अशीच परिस्थिती आहे. पंचायत समितीचे बारा गण असून, भाजप व काँग्रेसमध्ये खरी लढत होणार असल्याचे म्हटले जाते. असे असले तरी साहसिक जनशक्ती, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना यांचेही प्राबल्य काही गणांत आहे. तर काही ठिकाणी अपक्ष उमेदवार ही निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे पंचायत समितीवर आपली सत्ता यावी, यासाठी आतापासूनच विविध पक्षाचे पुढारी राजकीय खेळी खेळत सक्षम उमेदवाराचा शोध घेताना दिसत आहेत. आरक्षणाची सोडत कशी राहील, याचा अंदाज राजकीय नेत्यांना काही प्रमाणात असल्याने तशा उमेदवाराचा शोध सुरू असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. एकूणच परिसरात सध्या राजकीय वातावरण हळूहळू तापत आहेच.
निवडणूक काँग्रेस-भाजपसाठी प्रतिष्ठेचीच- सेलू तालुक्यात भाजप, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चांगलेच नेटवर्क आहे. गावागावात पदाधिकारी व कार्यकर्ते असून जिल्हा परिषदे व पंचायत समितीची निवडणूक भाजप व काँग्रेससाठी प्रतिष्ठेचीच राहणार आहे.
यांनी भूषविले सभापतीपद- अमृत काटकर (दोनवेळा), पुरुषोत्तम दाते, मनोहर सोनटक्के, सुरेश जयस्वाल, जंगलू मसराम, विजय जयस्वाल, चंदा उईके, रामचंद्र चाफले, भीमराव गोमासे, मैनावती सोनपितळे, नीलिमा दंडारे, श्रीराम तुमडाम, मंजुषा दुधबडे, जयश्री खोडे, अशोक मुडे यांनी सेलू पंचायत समितीचे सभापती म्हणून पद भूषविले आहे.
पहिल्या सभापतीचा मान काटकर यांचाच- सेलू पंचायत समितीचे पहिले सभापतीपद मोही येथील काँग्रेसचे अमृत सीताराम काटकर यांनी भूषविले होते. १९६२ ते १९९० सलग २८ वर्ष हे पद काँग्रेस पक्षाला मिळाले. पण नंतर जयस्वाल गटाची पकड या पंचायत समितीवर राहिली. त्यांना अपक्ष, भाजपची साथ मिळाली. अलीकडच्या दहा वर्षांत भाजपचे अधिपत्य या पंचायत समितीवर राहिले. २०१७ ते २०२२मध्येही भाजपची सत्ता होती. मात्र, प्रशासक राज सुरू होण्यापूर्वी भाजपचे अशोक मुडे हे सभापती होते. तर सध्या पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने पंचायत समितीवर प्रशासक राज आहे.