सरासरी १२३.९९ मिमी पावसाची नोंद : अनियमित पावसातही कपाशीची लागवड वर्धा : जिल्ह्यात मान्सूनचे आगमन झाल्याने शेतकरी पेरता झाला. कृषी विभागाच्यावतीने ४ लाख हेक्टरवर खरीपाचे नियोजन करण्यात आले आहे. यात आतापर्यंत ६७ हजार ३१७ हेक्टरवर पेरण्या आटोपल्याची नोंद कृषी विभागात झाली आहे. याची टक्केवारी १५.८१ एवढी आहे. यातही सोयाबीन व कपाशीच्या तुलनेत तुरीचे क्षेत्र अधिक असल्याचे दिसत आहे. गत दोन दिवसात जिल्ह्यात दमदार पाऊस आल्याने पेरणीचे क्षेत्र झपाट्याने वाढत असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे. पावसाबाबत अनिश्चितता व अनियमतेमुळे शेतकरी पेरणी करावी की थांबावे या विचारात असताना जूनच्या अखेरीस जिल्ह्यात पाऊस आल्याने शेतकऱ्यांनी पेरण्या सुरू केल्या. पेरण्या सुरू होताच कृषी विभागाच्यावतीन करण्यात आलेल्या सर्व्हेनुसार आतापर्यंत सोयाबीनचा १ हजार ८८७ हेक्टरवर पेरा झाल्याची नोंद करण्यात आली. या तुलनेत कपशीची लागवड करण्यात शेतकरी अग्रेसर असल्याचे दिसत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ५७ हजार ८५ हेक्टर कपाशीची लागवड झाली आहे. बऱ्याच शेतकऱ्यांनी कपाशीची मान्सूनपूर्व लागवड केली असल्याचे जिल्ह्यात दिसून आले. पावसाअभावी यातील हजारो हेक्टरवरील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट बळावण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील बऱ्याच शेतकऱ्यांनी मान्सूनपूर्व कपाशीची लागवड केली. शिवाय प्रारंभी आलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील कापूस उत्पादकांनी पावसाची आशा धरत लागवड केली; मात्र पावसाने हुलकावणी दिल्याने या पेरण्या फसल्या. अशातच वाढलेल्या तापमानामुळे अंकुरलेली बियाणे करपली. याचा फटका शेतकऱ्यांना बसला. रात्री पाऊस व दिवसा उन्ह या वातावरणामुळे शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसला. दुबार पेऱ्याचा सर्व्हे नाही दमदार पावसाशिवाय पेरण्या करू नये असे कृषी विभागाच्यावतीने सांगण्यात आले होते. असे असताना बऱ्याच शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. पावसाच्या अनिश्चिततेमुळे त्यांच्या पेरण्या फसल्या. त्यांच्यावर दुबार पेरणीची वेळ आली; मात्र जिल्ह्यात किती हेक्टरवर दुबार पेरणीचे संकट आहे, याचा कुठलाही सर्व्हे कृषी विभागाकडून करण्यात आला नसल्याचे विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
जिल्ह्यात १५.८१ टक्के पेरण्या
By admin | Published: June 29, 2016 2:04 AM