वर्धा कृउबा समितीतील प्रकार : आर्थिक अनियमिततेचा ठपका वर्धा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शरद देशमुख यांच्यावर आर्थिक घोळाच्या आरोपावरून झालेल्या चौकशीत तब्बल एक कोटी आठ लाख रुपयांचा घोळ झाल्याचे समोर आले. त्यांचे हे व्यवहार बाजार समितीकरिता धोक्याचे असल्याचा ठपका ठेवत त्यांनी पदमुक्त व्हावे, या मागणीकरिता येथील १६ सदस्यांनी एकत्र येत कलम १७ अन्वये तसा ठराव मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत सादर केल्याची माहिती आहे. येथील बाजार समितीची सर्वसाधारण सभा आज समितीच्या सभागृहात आयोजित होती. या सभेत सूचीतील सर्वच प्रश्नावर चर्चा झाली. यानंतर येथील सदस्य दत्ता महाजन, पवन गोडे व अर्पणा मेघे यांनी सभापतींच्या परवानगीने विशेष बाब म्हणून झालेल्या आर्थिक घोळाचा विषय सभेत ठेवला. यावर चर्चा सुरू असताना सदस्यांच्या प्रश्नांचे उत्तर देण्यास देशमुख असमर्थ ठरल्याने त्यांनी सभेतून काढता पाय घेतला. यामुळे येथे उपस्थित असलेल्या १८ पैकी १६ सदस्यांनी एकत्र येत सभापतींनी पदयुक्त व्हावे, असा ठराव ठेवला. या ठरावावर येत्या सभेत चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती समितीच्या सचिवांनी दिली. वायगाव (निपाणी) येथील शेतकरी रमेश वाळके यांनी सहा महिन्यांपूर्वी सभापती शरद देशमुख यांनी बाजार समितीत घोळ केल्याचा आरोप करीत त्याची चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली होती. मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेत उपनिबंधक कार्यालयाकडून सभापतीची चौकशी करण्याचे आदेश दिले. या चौकशीत त्यांनी थोडा थोडका नाही तर तब्बल १ कोटी ८ लाख रुपयांचा घोळ केल्याचे समोर आले. हा चौकशी अहवाल सदर शेतकऱ्याला दिला असता तो समितीतील भाजपाच्या सदस्यांच्या हाती लागला. या घोळाची माहिती मिळताच सभेत उपस्थित सर्वच सदस्य अवाक् झाले. यावेळी विरोधकांनी विचारलेल्या प्रश्नावर सभापतींनी उत्तर देण्याचे टाळत सभेतून काढता पाय घेतला. समितीच्या सभेत उपस्थित करण्यात आलेल्या या मुद्यावर सत्ताधारी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेससह विरोधात असलेल्या भाजपाच्या सदस्यांनी एकत्र येत सभापतींनी पदमुक्त होण्यावर चर्चा करून ठराव सादर केला. हा ठराव समितीकडे असून तो येत्या सभेत सादर करण्यात येणार असल्याची माहिती आहे. या सभेत यावर चर्चा होऊन तो पारित होतो अथवा तो बारगळतो याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.(प्रतिनिधी)
सभापतींच्या पदमुक्तीवर १६ सदस्यांत एकमत
By admin | Published: March 30, 2016 2:21 AM