पालकमंत्री पांदण योजना : चार तालुक्यांतील शेतकऱ्यांचा पुढाकार लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : आर्वी, हिंगणघाट, सेलू व समुद्रपूर तालुक्यात पालकमंत्री पांदण अतिक्रमण मुक्त रस्ते योजनेंतर्गत २० दिवसांत २५ किमी लांबीचे १७ पांदण रस्ते अतिक्रमण मुक्त करण्यात आले आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या रस्त्याच्या अडचणी दूर होऊन त्यांना वहिवाटीसाठी फायदा होत असल्याचे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले. पालकमंत्री पांदण अतिक्रमणमुक्त रस्ते योजनेंतर्गत अतिक्रमीत झालेले पांदण रस्ते मोकळे करण्यासाठी जिल्ह्याला सहा जेसीबी प्राप्त झालेले आहेत. या जेसीबीमार्फत जिल्ह्यातील अतिक्रमीत पांदण रस्ते मोकळे करण्यात येत आहेत. या योजनेला शेतकऱ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. आर्वी, हिंगणघाट, सेलू व समुद्रपूर तालुक्यातील अतिक्रमीत पांदण रस्ते मोकळे करण्याचे काम प्रगती पथावर आहे. वर्धा, देवळी, आष्टी व कारंजा तालुक्यातील कामे लवकरच हाती घेण्यात येणार असल्याचेही प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. या योजनेचा लाभ घेत शेतकऱ्यांनी जेसीबीच्या साह्याने पांदण रस्ते मोकळे करून घ्यावेत. यासाठी आपल्या योजना या मोबाईल अॅपवर तसेच संकेत स्थळावर आॅनलाईन अर्ज करावयाचे आहे. याबाबत काही अडचणी असल्यास जिल्हाधिकारी कार्यालय येथील टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी नवाल यांनी केले आहे. शेतकऱ्यांच्या शेती वहिवाटीचा प्रश्न निकाली ग्रामीण भागातील बहुतांश पांदण रस्त्यांवर अतिक्रमण झाल्याने शेतीची वहिवाट धोक्यात आली होती. शिवाय अनेक पांदण रस्त्यांची दुरवस्थाही झाली होती. आता यासाठी पालकमंत्री पांदण रस्ते अतिक्रमण मुक्त योजना राबविली जात आहे. यातून शेतकऱ्यांना पांदण रस्ते मोकळे करून घेता येत आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी थोडीफार आर्थिक तरतूद करावी लागत असली तरी शेतीच्या वहिवाटीचा प्रश्न निकाली निघत असल्याने प्रतिसाद मिळत आहे. आमच्या गावात ऊसाची शेती मोठ्या प्रमाणात आहे; पण रस्त्याच्या अडचणीमुळे दोन वर्षांपूर्वी माझ्या शेतातील ऊस कारखान्यात नेता आला नाही. ऊस शेतातच वाळल्यामुळे मोठे नुकसान सोसावे लागले. शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने पांदण रस्त्याची अत्यंत आवश्यकता होती. पांदण अतिक्रमणमुक्त रस्ता योजनेतून शासनाने जेसीबी उपलब्ध करून दिला आणि गावकऱ्यांच्या सहकार्याने पांदण रस्ता मोकळा केला. यावर्षी ट्रॅक्टर रस्त्यात फसणार नाही. तसेच मालाची ने-आण करण्यासाठी हा रस्ता अतिशय उपयुक्त ठरणार आहे. तीन गावातील शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. - नारायण पोटे, अल्पभूधारक शेतकरी, दहेगाव (मुस्तफा).
१७ पांदण रस्ते अतिक्रमणमुक्त
By admin | Published: May 24, 2017 12:53 AM