लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : तालुक्यात चार नद्या व अनेक मोघे नाले अशी निसर्ग देणगी असल्याने पाणीटंचाई नसली तरी कडक उन्हामुळे पाणीवापर वाढला आहे. त्यामुळे १६ गावात १७ खासगी विहिरी अधिग्रहित केल्या असून १४ गांवात १८ विंधन विहिरींना प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. शहरातसुद्धा दिवसाआड मुबलक पाणीपुरवठा केला जात आहे.तालुक्यात ७० ग्रामपंचायती असून लहान मोठी १२३ गावे आहेत. प्रशासनाने तीव्र पाणीटंचाई निवारणार्थ राबवायच्या उपाययोजना कृती आराखडा दोनमध्ये प्रस्तावित उपाययोजना राबविण्यासाठी २ कोटी ३ लाख तर तिसऱ्या टप्प्याकरिता १ कोटी १७ लाखांच्या खर्चाची तरतूद करण्यात आली आहे. या अंतर्गत खासगी विहीर अधिग्रहण, सार्वजनिक विहीर खोलीकरण, नळ पाणीपुरवठा योजना विशेष दुरुस्ती, नवीन हातपंप आदी कामे करण्यात येणार आहेत. याअंतर्गत बोरगाव दातार, कोपरा, सिरुड, पिपरी, चिकमोह, कुटकी, गौळ, वणी, येरणवाडी, पिंपळगाव (हाते), वाघोली, डायगव्हाण, सातेफल, चाणकी, बुरकोनी ला खासगी विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. तसेच सेलू मुरपाड, रिमडोह, पवनी, सिरसगाव, पिपरी, पिंपळगाव मा., शेकापूर, दारोडा, अल्लीपूर, फुकटा, प्रत्येकी एक व कानगाव, सावली वाघ, वडनेर, वेळा येथे प्रत्येकी दोन अशा १८ विंधन विहिरींना प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. यासाठी शासन यंत्रणा सज्ज झाली असून कृती आराखडा मंजूर करून कामे हाती घेण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. उन्हाच्या झळा दिवसेंदिवस तीव्र होत आहे. नागरिकांसोबतच पशु-पक्षी आणि वन्यप्राण्यांकरिता उष्णतामान त्रासदायक होत आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची व वैरणाची समस्या स्थानिक पातळीवर काही प्रमाणात निर्माण होत आहे.
१७ विहिरी अधिग्रहित, १८ बोअरवेल मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2019 10:18 PM