वर्धा : रेल्वेगाडीत चोरट्यांच्या टोळ्या सक्रिय असतात. प्रवाशांचे लक्ष विचलित करून चोरट्यांकडून साहित्य चोरून नेले जाते. त्यामुळे रेल्वेगाडीत गाढ झोप नको रे बाबा... असे म्हणण्याची वेळ आली आहे. कारण मागील वर्षभरात धावत्या रेल्वेगाडीत प्रवाशांचे साहित्य चोरून नेण्याच्या १७१ घटना घडल्या असून, तब्बल ९४ लाख ३१ हजार ५५६ रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे लोहमार्ग पोलिसांनी १५ चोरट्यांच्या मुसक्या आवळून त्यांच्याकडून ३१ लाख १४ हजार १०७ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती आहे.
रेल्वे प्रवास करताना मोबाइल, दागिने, पर्स चोरी, बॅग चोरी, चेन ओढणे, पाकीट लांबविण्याच्या घटना वारंवार घडत असतात. रेल्वेच्या विशेषत: आरक्षित, एसी डब्यात लग्नसराईच्या सीझनमध्ये हमखास चोऱ्या होतात. या चोऱ्या मोबाइल, चेन ओढून पळून जाणाऱ्या नसतात, तर मौल्यवान दागिन्यांच्या असतात. धावत्या रेल्वेगाड्यांमध्ये चोरी करणाऱ्या टोळ्या सक्रिय असतात. या टोळ्या चुटुकमुटुक चोऱ्या करण्याऐवजी एकदाच मोठी चोरी करतात. यात विशेषत: दागिने, रोकड, मोबाइलचा समावेश असतो. तसेच प्रवाशांच्या बॅगादेखील चोरून नेेल्या जातात. पर्स, दागिने लांबविणाऱ्या टोळ्या रेल्वेच्या सर्वसाधारण डब्यात, रेल्वेस्थानकावर होणाऱ्या गर्दीत महिलांच्या गळ्यातील सोन्याची पोत, पर्स लांबविणाऱ्या महिलांच्या टोळ्या आहेत. गर्दीचा फायदा घेत चोरटे चोरी करतात.
फलाटांवर ४६ प्रवाशांना केले ‘टार्गेट’
रेल्वेगाडीची वाट पाहत प्रवासी फलाटावर बसून असतात. अनेकदा गाड्या उशिराने धावत असल्याने प्रवासी ताटकळत असतात. परिणामी, फलाटावर गर्दी होते. याच गर्दीचा फायदा घेत चोरट्यांकडून प्रवाशांना टार्गेट केले जाते. मागील वर्षभरात फलाटावर ४६ जणांना चोरट्यांनी लक्ष्य करून १३ लाख ४७ हजार ८३५ रुपयांचे साहित्य चोरून नेले. लोहमार्ग पोलिसांनी ११ चोऱ्यांची उकल करून ११ चोरट्यांना बेड्या ठोकल्या. तसेच २ लाख ६९ हजार ३९० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून गुन्ह्यांची उकल केली आहे.
वेटिंग रूममध्ये १२ जणांचे साहित्य लंपास
रेल्वेगाडीच्या प्रतीक्षेत फलाटावर असलेल्या वेटिंग रूममध्ये आराम करणाऱ्यांचे मोबाइल, पर्स चोरून नेण्याच्या घटना घडल्या आहेत. १२ प्रवाशांना चोेरट्यांनी टार्गेट करून २ लाख ६० हजार ५८० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. लोहमार्ग पोलिसांनी ७ चोरट्यांना अटक करून गुन्ह्यांची उकल करत १ लाख ८१ हजार ९८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
चोरीची विशिष्ट पद्धत...
चोरीसाठी गँगमधील अनेकजण विविध स्टेशनवरून प्रवाशांच्या बॅगेत दागिने, रोकड आहे का, यावर नजर ठेवतात. एकदा दागिने असल्याची खात्री झाली की चोरी कोणत्या रेल्वेस्थानकावर करायची, कशी करायची, साहित्य कुणी आणायचे, कसे आणायचे, पकडले तर काय करायचे आदी बाबतचे प्लानिंग तयार असते. मोबाइलवरून हे सर्व चोरटे एकमेकांच्या संपर्कात असतात. चोरलेला माल वेगळ्या दिशेने जाणाऱ्या रेल्वेत बसून चोरटे बाजारपेठेत आणतात. यामुळे पोलिसांना चोरट्यांचा शोध घेताना अनेकदा अडचणी येतात.
गाडी ‘स्लो’ होताना मोबाइल चोरी
अनेक प्रवासी रेल्वेत जागा नसल्याने रेल्वेच्या पायरीवर बसतात. काहीजण मोबाइल हातात काढून पाहतात. जेव्हा एखादे रेल्वेस्थानक येते तेव्हा गाडी स्लो होते. नेमक्या याच संधीचा फायदा घेत चोरी करणारे हातात काडी घेऊन रेल्वेच्या बाजूने उभे असतात त्यांच्याजवळ गाडी आली की काही समजण्याच्या आतच काडी मोबाइलधारकाच्या हातावर मारतात. मोबाइल खाली पडतो. मोबाइलधारक ओरडतो, मात्र गाडी फलाटाकडे जाते. उडी मारली तर जीव गमाविण्याचा धोका असतो. विशेष म्हणजे येथे आरपीएफ, रेल्वे पोलिस नसतात.