वर्धा : जिल्ह्याचा पारा ४७ अंशावर स्थिरावत आहे. या वाढत्या तापमानामुळे सर्वत्र पाण्याचे दुर्भिक्ष जाणवू लागले आहे. या वाढत्या तापमानाचा फटका जलाशयांनाही बसत असून त्यांची पातळी कमालीची घसरत आहे. जिल्ह्याच्या पाटबंधारे विभागाच्यावतीने घेण्यात येत असलेल्या १५ जलाशयांची टक्केवारी दिवसेंदिवस खालावत आहे. या जलाशयात केवळ १८ टक्के जलसाठा शिल्लक राहिला आहे. यामुळे पाणी टंचाईचे चित्र जिल्ह्यात आणखी भीषण रूप धारण करण्याचे संकेत मिळत आहे.जिल्ह्यात असलेल्या १५ प्रकल्पांपैकी १४ प्रकल्पात वापरण्यायोग्य जलसाठा असला तरी नांद प्रकल्पात मात्र कोरड पडली आहे. अशीच अवस्था जिल्ह्यातील लघू प्रकल्पाची झाली आहे. एकूण असलेल्या २० लघू प्रकल्प कोरडे पडले असल्याने रानात भटकंती करणाऱ्या जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उद्भवत आहे. पारा कमी जास्त होत असल्याने बऱ्यास पकल्पातील जलस्तर घसरण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यात लालनाला व पोथरा ही दोन जलसाठे कोरडी पडण्याच्या जवळ आल्याचे त्यांच्यात असलेल्या पाण्याच्या टक्केवारीवरून दिसत आहे. इतर जलाशयाचीही हीच अवस्था असल्याचे दिसून येत आहे. धाम प्रकल्पातून वर्धा शहराला पाणी पुरवठा होत आहे. या धरणात जलसाठा असल्याने शहराला पाणी टंचाईची झळ बसणार नाही.(प्रतिनिधी)
१५ धरणांत १८ टक्केच जलसाठा
By admin | Published: May 24, 2015 2:23 AM