लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : पुलगाव-आर्वी मार्गावरील हिवरा कावरे येथील शेतात अवैधरित्या साठविलेल्या रेतीच्या ठिय्यावर धाड टाकून २२ लाख २३ हजार रुपयांची १,८०० ब्रास रेती जप्त केली. तहसीलदार तेजस्विनी जाधव व चमूने सोमवारी सकाळी ७ वाजता ही कारवाई केली. यावेळी घटनास्थळावर विनापरवाना रेती भरीत असलेल्या ३१ ट्रकवर दंडात्मक कारवाई करुन त्यांची रवानगी देवळीच्या तहसील कार्यालयात करण्यात आली. विशेष म्हणजे कारवाई केलेले सर्व ट्रक अमरावती जिल्ह्यातील असल्याचे उजेडात आले. वर्धा जिल्ह्यातील रेतीची अवैधरित्या बाहेर जिल्ह्यात तस्करी होत असल्याचे या माध्यमातून पुन्हा एकदा सिद्ध झाले.प्राप्त माहितीनुसार किशोर कलपे, पुलगाव यांच्या शेत सर्व्हे नंबर ४२/१ येथे विनापरवाना रेतीचा मोठ्या प्रमाणात साठा असल्याची माहिती तहसीलदारांना मिळाली. त्यानुसार माहितीच्या आधारे सापळा रचून आज सकाळी धाड घालण्यात आली. घटनास्थळावर अवैधरित्या रेती भरीत असलेल्या अमरावती जिल्ह्यातील ३१ ट्रकला पकडून त्यांच्यावर प्रती ब्रास २० हजार ४०० याप्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात आली. यापैकी काही ट्रक खाली व काही रेती भरलेल्या अवस्थेत पकडण्यात आले. कारवाई करण्यात आलेल्या ट्रकमध्ये ३१ ब्रास रेती असल्याचे जिल्हा खनीकर्म अधिकारी शेख यांनी याप्रसंगी सांगितले. शेतात अवैधरित्या साठवलेल्या रेतीच्या साठ्याचा जाहीर लिलाव करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.शासकीय दरानुसार प्रति ब्रास १,२३५ रुपये याप्रमाणे एक हजार आठशे ब्रासची किंमत २२ लाख २३ हजार काढण्यात आली. हा गोरखधंदा अनेक वर्षांपासून सुरू असल्याचे तसेच पकडण्यात आलेला रेतीचा हा ठिय्या पुलगाव येथील एका रेती तस्कराचा असल्याचे उजेडात आले. शासनाचा लाखो रुपयांचा महसूल यामाध्यमातून चोरल्या जात असल्यामुळे ही बाब महसूल विभाग व खनीकर्म विभागाच्या अधिकाºयांसाठी आत्मपरिक्षण करणारी ठरली आहे. या रेती तस्करांवर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच कोणतीही तडजोड न करता कारवाईचे अस्त्र उभारण्यात यावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.ही कारवाई तहसीलदार जाधव यांच्यासह पुलगावचे पोलीस उपनिरीक्षक मराठे, वरिष्ठ लिपीक जी.पी.कावळे, तलाठी डी.डी. राऊत व के.एस.बुडगे वाहनचालक शेख अफजल व कर्मचाºयांनी केली.या कारवाईत अब्दुल शहा सुभान शहा, अखिल खान, दत्ता गिरी, सद्दाम चौधरी, फरीदभाई, मुदलकर, विशाल देवकर, सनी चव्हाण, विक्की गुप्ता, डी.ए. अंबोरे, मयुबभाई चौधरी, गंगुभाऊ बेनीवाले, मेराजखान, चांदभाऊ, जब्बुभुरा, निसारभाई, जयदेव पाटील, किशोर पवार, सतीश सावळे, अमीलखान, अखीलखान, निसारभाई, कमला नांदणे, सलीमभाई सर्व राहणार अमरावती तसेच कुºहा येथील अहमदभाई, इजाजभाई, धामणगाव येथील क्रिष्णा बोडे, बडनेरा येथील संमसुजमा आदींवर गुन्हे दाखल केले आहे.जप्तीतील ३१ ट्रक अमरावती येथीलया कारवाईत जप्त करण्यात आलेले सर्वच ट्रक अमरावती जिल्ह्यातील असल्याचे समोर आले आहे. वर्धा जिल्ह्यातील रेतीघाट असताना येथील रेतीची वर्धेत साठवणूक करून त्याची तस्करी करणारा हा रेती तस्कर वर्धेतील की अमरावतीतील याचा तपास करणे गरजेचे आहे. अमरावती जिल्ह्यात रेती माफियांवर कोट्यवधी रुपयांचा दंड आकारण्यात येत आहे. यामुळे तेथील रेती माफिया वर्धेत पाय पसरत असल्याचे या कारवाईतून समोर येत आहे.
२२ लाखांची १,८०० ब्रास रेती जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 11:55 PM
पुलगाव-आर्वी मार्गावरील हिवरा कावरे येथील शेतात अवैधरित्या साठविलेल्या रेतीच्या ठिय्यावर धाड टाकून २२ लाख २३ हजार रुपयांची १,८०० ब्रास रेती जप्त केली.
ठळक मुद्देविनापरवाना साठविलेल्या रेती ठिय्यावर धाड