महेश सायखेडे लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : थकबाकीदारांचे कुठलेही विद्युत देयक माफ केले जाणार नसल्याचे उर्जामंत्र्यांनी स्पष्ट केले असले तरी थकबाकीदारांनी महावितरणे आखून दिलेल्या तीन टप्प्यात थकबाकी आणि नियमित येणारे देयक अदा केल्यास थकबाकीवर लागलेल्या व्याजाची रक्कम माफ होणार आहे. जिल्ह्यात १ लाख ८३ हजार घरगुती वीज ग्राहकांकडे सध्या ७५ कोटी ३१ लाख रुपयांची थकबाकी आहे. या थकबाकीदारांनी नियमानुसार तीन टप्प्यात विद्युत देयक अदा केल्यास त्यांचे ९० लाख ३५ हजारांचे व्याज माफ होणार आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात आणि देशात लॅाकडाऊन जाहीर करण्यात आला. तर याच काळात अनेकांचा रोजगारही हिरावल्या गेला. अशातच सुरूवातीला महावितरणे नागरिकांना मागील तीन महिन्यातील वीज वापर पाहून देयक दिले. त्यानंतर लॅाकडाऊनमध्ये शिथिलता मिळाल्यावर मिटर वाचन करून देयक देण्यात आली. ही देयक नागरिकांच्या हाती पडताच आपल्याला जादा विद्युत देयक देण्यात आल्याची ओरड झाली. त्यानंतर लॅाकडाऊनच्या काळातील विद्युत देयक माफ करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. या मागणीवर विचार होत उर्जामंत्र्यांनी विद्युत देयक माफ केले जाणार नाही, असे स्पष्ट केले आहे. तर मुख्यमंत्री स्तरावर सध्या या विषयी विचार होत आहे. असे असले तरी थकबाकीदारांना त्यांचे व्याज माफ करून घेण्यासाठी सुवर्ण संधीच सध्या महावितरणे उपलब्ध करून दिली आहे. त्यासंदर्भातील सूचनाही महावितरणच्या अधीक्षक अभियंता कार्यालयाला प्राप्त झाल्या आहेत.
एकाच वेळी विद्युत देयक भरल्यास मिळेल २ टक्क्यांची विशेष सवलतएखाद्या थकबाकीदार व्यक्ती किंवा संस्थेने एकाच वेळी थकबाकीची रक्कम भरल्यास त्याचे देयकात लागून आलेले व्याज माफ होत त्या ग्राहकाला पुढील देयकात २ टक्केची सवलत दिली जाणार आहे. त्यामुळे विशेष सवलतीचा लाभ घेणाऱ्यांसाठी महावितरणची ही योजना उपयुक्तच आणि दिलासा देणारी ठरणारी आहे. विशेष म्हणजे ही योजना घरगुती वीज ग्राहक, वाणिज्य ग्राहक तसेच औद्यागिक ग्राहकांनाही लागू होणार आहे.
महावितरणने थकबाकीदारांसाठी नवीन योजना आणली आहे. या योजनेचा लाभ घेतल्यास त्या ग्राहक किंवा संस्थेला विद्युत देयकातील व्याज माफ केले जाणार आहे. शिवाय एकाच वेळी रक्कम अदा करणाऱ्यास २ टक्केची सुट दिली जाणार आहे. याचा लाभ विद्युत वापर संस्था आणि जिल्ह्यातील नागरिकांनी घ्यावा.- डॅा. सुरेश वानखेडे, अधीक्षक अभियंता, महावितरण, वर्धा.