हुतात्मा स्मारक परिसरात आयोजन : शिबिरात ५५ मुला-मुलींचा सहभाग वर्धा : प्रहार संस्थेच्यावतीने पाच दिवसीय १८७ व्या प्रहार अॅडव्हेंचर कॅम्पचे आयोजन करण्यात आले. सेवाग्राम येथील हुतात्मा स्मारक परिसरातील शिबिरास मंगळवारी प्रारंभ झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्कॉऊटचे राज्य मुख्यालय आयुक्त रामकुमार जयस्वाल तर अतिथी म्हणून सामाजिक कार्यकर्ते इमरान राही, प्रभाकर पुसदकर, निसर्ग सेवा समितीचे अध्यक्ष मुरलीधर बेलखोडे, प्रहारचे उपाध्यक्ष प्रदीप दाते, शिबिर प्रमुख तथा प्रहारचे अध्यक्ष कॅप्टन प्रा. मोहन गुजरकर आदी उपस्थित होते. शिबिरात जिल्ह्यातील निवडक ५५ मुला-मुलींचा सहभाग आहे. आज देशासमोर भ्रष्टाचार, गरीबी जातीवाद, हिंसा व आंतकवादासारख्या समस्या उभ्या आहेत. सदर समस्यांवर मात करण्यासाठी सशक्त व सुजान नागरिकांची फळी निर्माण होण्याची गरज आहे. या दृष्टिकोनातून प्रहार संस्थेच्या साहस व सैनिकी प्रशिक्षणातून शालेय विद्यार्थी व युवकांत निर्भयता, जागरुकता, शिस्त, राष्ट्रप्रेम व नैतिक मूल्य निर्माण होत आहे, असे मत राही यांनी व्यक्त केले. पुसदकर यांनी प्रहार संस्था बालकांवर योग्य संस्कार करीत असून आपल्या देशाची खरी संपत्ती निर्माण करीत आहे, असे सांगितले. दाते यांनी प्रहारच्या प्रशिक्षणातून सैनिकी मानसिकता समाजात निर्माण होत असून ही बाब प्रशंसनीय असल्याचे सांगितले. प्रहार अॅडव्हेंचर कॅम्पचे उद्घाटन विविध अडथळा पार प्रशिक्षणाने करण्यात आले. यात ‘बर्मा व्रिज’ हे आॅब्स्टकल शिबिरार्थ्यांचे आकर्षण केंद्र ठरलेले आहे. ‘हम युवा प्रहारी, हम बढे चलो, बढे चलो...’ या देशभक्तीपर गीताने प्रहारींनी मान्यवरांचे स्वागत केले. याप्रसंगी प्रहार संस्थेच्या प्रशिक्षणातून प्रेरणा घेऊन सैन्य दलात सामील झालेले सैनिक सुप्रभात बावनगडे आणि तटरक्षक दलाचे जवान चेतन खडसे यांचा उपस्ति मान्यवरांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला. प्रास्ताविकातून गुजरकर यांनी प्रहार संस्थेच्या उपक्रमांची माहिती दिली. संचालन संतोष तुरक यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा. रवींद्र गुजरकर यांनी मानले. कार्यक्रम तथा शिबिराच्या यशस्वीतेकरिता अश्विनी घोडखांदे, वैशाली गुजरकर, वृशाली गुजरकर, साकीब पठाण यांच्यासह प्रहारचे स्वयंसेवक प्रयत्न करीत आहेत.(कार्यालय प्रतिनिधी)
प्रहारच्या ‘१८७ व्या अॅडव्हेंचर कॅम्प’ला प्रारंभ
By admin | Published: April 26, 2017 12:27 AM