रूपेश खैरी वर्धा शासनाच्या आदेशानुसार वर्धा नगर परिषदेच्या हद्दीत हातबंडीवर साहित्य विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या हॉकर्सला ओळखपत्र देण्यात आले. शहरात एकूण १ हजार ४७ हॉकर्स नोंदणीकृत असून त्यांच्याकडून वर्षाकाठी १८ लाख ८४ हजार ६०० रुपयांचा कर वसूल करण्यात येतो. एवढा कर वसूल होत असताना पालिकेच्यावतीने त्यांना कुठल्याही सुविधा पुरविण्यात येत नसल्याचे दिसून आले आहे. ओळखपत्र असलेल्या या हॉकर्सना व्यवसाय करण्याकरिता ‘हॉकर्स झोन’ म्हणून एक ठिकाण पालिकेच्यावतीने निश्चित करणे गरजेचे होते. असे असताना वर्धा पालिकेकडून या दृष्टीने कुठल्याही हालचाली करण्यात आल्या नाहीत. तसा कुठला प्रस्तावही पालिकेच्यावतीने तयार करण्यात आला नसल्याची माहिती आहे. नोंदणी असलेल्या एका हॉकर्सकडून पाच रुपये रोज घेणाऱ्या पालिकेकडून त्यांना सुविधा पुरविण्यासाठी कुठल्याही हालचाली नाही. वर्धा पालिकेत १ हजार ४७ हॉकर्स नोंदणीकृत असून शहरात अनेक नोंदणी नसलेले हॉकर्स व्यवसाय करीत आहेत. नोंदणी केलेल्या हॉकर्सला ओळखपत्र देण्यात आले आहे. ते वापरणे त्यांच्याकरिता अनिवार्य असताना या ओळपत्रांचा वापर त्यांच्याकडून होत नसल्याचे दिसते. शोध घेतल्यास एकाही हॉकर्सकडे ओळखपत्र सापडणे कठिणच. देण्यात आलेले कार्ड हे हॉकर्स वापरतात वा नाही, याची तपासणीही पालिकेकडून करण्यात येत नाही. पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून रोज पाच रुपये मात्र नियमित वसूल करण्यात येत आहेत. करवसुली होत असल्याने या हॉकर्सना काही आवश्यक सुविधा पुरविणे पालिकेचे कर्तव्य आहे; पण तसे होत नसल्याने हॉकर्सच्या हातगाड्या रस्त्यांवर लागतात. यात शहरातील बाजार परिसर असो वा बजाज चौक, आर्वी नाका असो वा सोशालिस्ट चौक या चौकांत हागाड्यांची गर्दी पाहावयास मिळते. हॉकर्सच्या हातगाड्या रस्त्याच्या कडेला असल्याने वाहनचालकांशी त्यांचे वादही होतात. हातगाड्या रस्त्याच्या कडेला उभ्या असल्याने वाहतुकीची कोंडी होत अनेक किरकोळ अपघात झाले आहेत. वाहतुकीची कोंडी केवळ हॉकर्सच्या हातगाड्यांनी होत नाही तर बाजार परिसरात असलेले अनेक व्यावसायिक त्यांच्या दुकानातील साहित्य रस्त्यावर ठेवतात, हे सुद्धा एक कारण आहे. याकडे पालिकेसह पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. रस्त्यांवर लागणाऱ्या हातगाड्यांमुळे मोठी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे पालिकेने याकडे वेळीच लक्ष देत कार्यवाही करणे गरजेचे आहे. शहरात हातबंडीवर साहित्य विकून आपला उरनिर्वाह करीत असलेल्या हॉकर्सचा शासनाच्या आदेशानुसार एक सर्वे झाला आहे. त्यानुसार त्यांना सूचना करून काही कागदपत्र मागवित त्यांना ओळखपत्र देण्यात आले आहे. आता या संदर्भात नव्याने पुन्हा सर्वेक्षण होणार असल्याचे पालिकेच्यावतीने सांगण्यात आले आहे. यात ज्या हॉकर्सकडे ओळखपत्र नाही, त्याला ओळखपत्र देण्यात येणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे. बाजार परिसरातील रस्त्यांवर हातबंडी लावत व्यावसाय करणाऱ्यांसह काही व्यापाऱ्यांकडून रस्त्यांवर दुकानातील साहित्य ठेवण्यात येत आहे. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याचे समोर आल्याने वर्धा पोलीस विभागाकडून वाहतूक चार्ली पथक तयार करण्यात आले. ते पथक शहरात कार्यरत असताना शहरात सुरू असलेला हा प्रकार तसाच आहे. या सर्व प्रकारामुळे वाहतुकीला निर्माण होणारा अडथळाही अद्याप कायमच असल्याचे दिसते. नोंदणीकृत हॉकर्सकडून दररोज पाच रुपयांप्रमाणे कर वसूल करण्यात येत आहे. त्यांना ओळखपत्रही देण्यात आले आहे. या हॉकर्सकरिता हॉकर्स झोन निर्माण करणे गरजेचे आहे; पण यावर सध्या पालिकेकडून कुठल्याही हालचाली नाहीत. - अजय बागरे, प्रशासकीय अधिकारी, नगर परिषद, वर्धा.
१९ लाखांच्या करात सुविधा शून्यच
By admin | Published: July 21, 2016 12:36 AM