तीन दिवस विविध कार्यक्रम : गावातील चिमुकल्यांसह ज्येष्ठांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; गतवर्षीच्या तुलनेत उपस्थिती वाढलीसेलू : संपूर्ण महाराष्ट्रात लौकिक प्राप्त व १९ वर्षांची परंपरा जोपासत सुरगाव येथील रंगमुक्त अभिनव धुलिवंदन व संत विचार ज्ञान यज्ञ त्रिदिवशीय कार्यक्रमााचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांना गावकऱ्यांनी उत्तम प्रतिसाद दिला. तीन दिवसांपासून सुरू असलेल्या कार्यक्रमाचा गुरुवारी समारोप झाला. सुरगाव येथे गत १९ वर्षांपासून छोट्यांसह ज्येष्ठापर्यंत कुणीही धुलिवंदनाच्या दिवशी रंग खेळत नाही. गावात लाकडे जाळून होळी न पेटविता ग्रामसफाईतून निघणाऱ्या कचऱ्याची होळी केल्या जाते. सुरगाव येथील ग्रामस्थ व श्री संत नानाजी महाराज, श्री गुरुदेव सेवा मंडळाच्यावतीने आयोजित हा कार्यक्रम यंदाही संपन्न झाला. पंचक्रोशीतीलच नव्हे तर विदर्भाच्या विविध गावातून पाहूणे हा आनंद सोहळा पाहण्यासाठी सुरगावात दाखल झाले होते. रंगपंचमीच्या दिवशी सकाळी निघालेली नामधून (मिरवणूक) डोळ्याची पारणे फेडणारी होती. डोक्यावर भगव्या टोप्या घातलेले गुरुदेव प्रेमी शिस्तबद्ध रांगेत चिमुकले, महिला-पुरुष सारेच स्वच्छ वस्त्र परिधान करून नामधूनमध्ये सहभागी झाले होते. राष्ट्रसंताच्या खड्या आवाजातील भजने, सर्व संताचा जयघोषाने आसमंत दुमदुमून गेला होता. प्रत्येकांच्या घरासमोर संताच्या प्रतिमा सजविलेल्या आसनावर होत्या. तोरण, पतका गेट कमानी सर्वांच्या स्वागतासाठी उभारल्या गेल्या होत्या. नामधून कार्यक्रम स्थळी उभारलेल्या मंडपात पोहचल्यावर मान्यवरांनी विचार व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सप्तखंजेरी वादक भाऊ थुटे तर अतिथी म्हणून ठाणेदार संतोष बाकल, डॉ. जाजू, मोहन अग्रवाल, सुनील बुरांडे, रवी खडतकर, अवचित सयाम, बा.या. वागदरकर, अॅड. वैभव वैद्य, अनिल चौधरी, सचिन देवगीरकर, मुरलीधर बेलखोडे, गंगाधर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. तीन दिवस असलेल्या महोत्सवात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या तीन दिवसात विद्यार्थी, शेतकरी व ग्रामस्थ यांच्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यात अनेक मान्यवरांनी प्रबोधन व विविध विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक या अभिनव धुलिवंदनाचे मुख्य प्रेरक व सप्तखंजेरी वादक प्रवीण महाराज देशमुख यांनी केले. याप्रसंगी दररोजच्या ज्ञान प्रार्थनेतील उपासकांना विविध क्षेत्रात शासकीय नोकरी मिळली. त्यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ देवून सपत्नीक सत्कार करण्यात आला तर गावातील गरिबांना वस्त्रदानाचा व विविध स्पर्धेत विजेत्यांना बक्षीस वितरणाचा कार्यक्रमही पार पडला.कार्यक्रमाचे संचालन प्रियंका देशमुख व प्राची वानखेडे यांनी केले. यशस्वीतेकरिता सोनाली ठाकरे, रूपाली ठाकरे, कांचन मेहता, प्रणाली कोरडे, कविता मेश्राम, प्राजक्ता ठाकरे, प्राजक्ता चनेकर, ममता राऊत यांच्यासह गावातील युवक, महिला, ग्रामस्थ यांनी सहकार्य केले.(तालुका प्रतिनिधी)
१९ व्या वर्षीही झाले सुरगावात रंगाविना धुलिवंदन
By admin | Published: March 26, 2016 1:55 AM