श्रीकांत तोटे लोकमत न्यूज नेटवर्कपवनार : शेतऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याकरिता सिंचनाशिवाय पर्याय नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना सिंचन सुविधा उपलब्ध करुन द्यावी आणि पाण्याचीही बचत व्हावी, याकरिता शासनाकडून तुषार व ठिंबक सिचंनाकरिता अनुदान दिले जाते. जिल्ह्यात सन २०१९- २० या वर्षाकरिता तुषार व ठिंबक सिंचन योजनेकरिता ५ हजार ६३३ शेतकऱ्यांनी अर्ज केले होते. त्यातील २ हजार ७३१ शेतकऱ्यांचे अर्ज मंजूर झाले असून त्या सर्वांच्या खात्यात अनुदानाची रक्कम जमा झाल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे.आठही तालुक्यातील ५ हजार ६३३ शेतकऱ्यांनी ठिंबक व तुषार सिंचनाच्या संचाची मागणी केली होती. कागदपत्राची पूर्तता न करणे, प्राथमिक मंजुरी न घेणे, ऑनलाईनसह ऑफलाईन अर्ज सादर न करणे, दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त देयक सादर करणे व अपूर्ण माहिती देणे आदी कारणांमुळे २ हजार ९०२ शेतकऱ्यांचे अर्ज नामंजूर करण्यात आले. त्यामुळे उर्वरित २ हजार ७३१ शेतकऱ्यांनी संचाची उचल केली असून त्यांना शासनाकडून जाहीर केलेल्या अनुदानाची रक्कमही अदा करण्यात आली आहे.
५५% मिळते अनुदान
अल्पभूधारक शेतकऱ्याला ५५ टक्के तर पाच एकरावरील ४५ टक्के अनुदान दिले जाते. तुषार सिंचनासाठी अनुदान राशी ही ५५ टक्केनुसार १२ हजार ४५ रुपये तर ४५ टक्केनुसार ९ हजार ८५५ इतकी दिली जाते. ठिंबक सिंचनासाठी कमीत कमी ७ हजार १३३ तर जास्तीत जास्त २ लाख ९९ हजार ८५० रुपये दिली जाते.
अनुदान मिळण्यात आहेत अडचणीबाजारात एक तुषार संच २९ हजार ते ३१ हजार ५०० रुपयांपर्यंत मिळतो. परंतु केंद्रीय समितीने २९ हजार ९०० रुपयांची शिफारस केली आहे. त्यामुहे जवळपास साडे नऊ हजार रुपयांपर्यंत तफावत दिसून येते. याचा भार शेतकऱ्यांवर पडतो. बऱ्याच ठिकाणी तलाठी किंवा कृषी कार्यालयाकडूनही सहकार्य मिळत नसल्याचे शेतकरी सांगतात.
यावर्षी मार्चमध्ये मी माझ्या शेतात ठिबक सिंचन संच घेतला असून त्या आधारे उत्पन्नही घेत आहे. मात्र अद्याप पर्यंत अनुदानाची रक्कम खात्यात जमा झाली नाही. याबाबत तलाठ्यांना विचारणा करुनही टाळाटाळ होत आहे.- सुनील हिवंज, शेतकरी, सेलूकाटे
२०१९-२० वर्षाकिरता तालुक्यातील मागणीची पूर्तता झाली असून सर्वांच्या खात्यात अनुदानाची राशी पोहोचलेली आहे. २०२०-२१ साठी कुठलाही आर्थिक लक्षांक अद्यापपर्यंत शासनाकडून आलेला नाही. व्ही.टी. चव्हाण, तालुका कृषी अधिकारी.