लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मागील आठ दिवसांत जिल्ह्यात तब्बल १९ हजार ९१२ व्यक्तींनी कोविड चाचणी केली असता २ हजार ६५४ व्यक्तींचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. १ ते ८ एप्रिल या कालावधीत सापडलेल्या या नवीन कोविड बाधितांमध्ये तब्बल १ हजार ३५० रुग्ण वर्धा तालुक्यातील तर ४६९ कोविड बाधित हिंगणघाट तालुक्यातील आहेत. जिल्ह्यातील आठही तालुक्यांचा विचार केल्यास वर्ध्यानंतर आता हिंगणघाट तालुका कोविड हॉटस्पॉट होऊ पाहत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.मागील आठ दिवसांपासून जिल्ह्यात नवीन कोविड बाधित सापडण्याची गती झपाट्याने वाढली आहे. गुरुवारी जिल्ह्यात ४९५ इतकी रेकॉर्ड ब्रेक नवीन कोविड बाधितांची नोंद घेण्यात आली. मागील आठ दिवसांत जिल्ह्यात २ हजार ६५४ नवीन कोविड बाधितांची भर पडली असली तरी याच आठ दिवसांच्या काळात तब्बल २ हजार ८९ रुग्णांनी कोरोनावर विजय मिळविला आहे. तर ३९ व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दिवसेंदिवस कोविड बाधितांसह कोविड मृतांच्या संख्येत वाढ होत असल्याने प्रत्येक नागरिकांनी दक्ष राहून जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे. तसे आवाहनही जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे. जिल्ह्यात सध्या दोन हजाराहून अधिक ॲक्टिव्ह कोविड बाधित आहे. असे असले तरी त्यापैकी अर्ध्यापेक्षा जास्त कोविड बाधित गृहअलगीकरणात आहेत.
३९ व्यक्तींचा घेतला कोरोनाने बळीजिल्ह्यातील कोविड मृतकांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. मागील आठ दिवसांत तब्बल ३९ व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तशी नोंदही आरोग्य विभागाने घेतली आहे. तर शुक्रवारी तब्बल सहा व्यक्तींचा कोविडने बळी घेतला आहे.
२ हजार ८९ रुग्णांचा कोविडवर विजयमागील आठ दिवसांत एकूण २ हजार ८९ कोविड बाधितांनी कोरोनावर विजय मिळविला आहे. १ एप्रिलला ३३०, २ एप्रिलला ३२६, ३ एप्रिलला १९८, ४ एप्रिलला २४९, ५ एप्रिलला ३०८, ६ एप्रिलला २५१, ७ एप्रिलला २२२ तर ८ एप्रिलला २०५ व्यक्ती कोविडमुक्त झाल्याची नोंद आरोग्य विभागाने घेतली आहे.