जिल्ह्यात ४.७० कोटींंच्या थकबाकीपोटी महावितरणचा शॉक वर्धा: जिल्ह्यातील आर्वी, हिंगणघाट आणि वर्धा तालूक्यातील वीजबिलांपोटीच्या थकबाकीमुळे सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांची वीज खंडित करण्याची मोहीम महावितरणने सुरू केली आहे. यात सर्वाधिक फटका आर्वी विभागातील पाणीपुरवठा योजनांना बसला आहे. या विभागातील तब्बल २२ सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. हिंगणघाट विभागातील एक तर वर्धा विभागातील दोन अशा एकूण २४ पाणी पुरवछा योजनांचा वीजपुरवठा खंडित केला आहे. सध्या महावितरणकडून थकबाकी वसुलीकरिता थकबाकीदारांचा पुरवठा खंडीत करण्याचा सपाटा सुरू आहे. यात नागपूर परिमंडलातील पाणीपुरवठा योजनांकडे तब्बल ३१ कोटी ४५ लाख रुपये थकले आहे. यात वर्धा जिल्ह्यात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, महानगरपालीका, नगरपरिषदा यांच्यामार्फ़त राबविण्यात येणाऱ्या सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या एकूण ७९६ वीज जोडण्यांवर तब्बल ४ कोटी ७० लाखांची थकबाकी आहे. महावितरणच्या आर्वी विभागात ३०९ सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांकडे १ कोटी ६८ लाखांची थकबाकी आहे. याशिवाय हिंगणघाट विभागात २४९ योजनांकडे २ कोटी ८ लाख तर वर्धा विभागातील २३८ योजनांकडे ९३ लाखांची थकबाकी आहे. त्यापैकी आर्वी विभागातील २३ योजनांनी ७ लाखाचा भरणा केला असून २२ योजनांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. हिंगणघाट विभागातील १२ ग्राहकांनी २ लाख ३७ हजाराचा भरणा केला असून एका ग्राहकाचा वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित करण्यात आला आहे. वर्धा विभागातील ३७ ग्राहकांनी ८ लाख ३९ हजाराचा भरणा केला असून दोन ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. या सर्व थकबाकीदार सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांनी त्वरीत थकबाकीचा भरणा करून नागरिकांची गैरसोय टाळण्याचे आवाहन आहे. यासंदर्भात महावितरणने वेळोवेळी सर्व संबंधितांना सुचना असतांनाही ही थकबाकी वसुल करण्यासाठी महावितरणने तेथील वीजपुरवठा खंडित करण्याची कठोर भुमिका घेतली आहे. महावितरणने या थकबाकीदार सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा खंडित केल्याने या भागातील नागरिकांना कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची वेळ आली आहे. थकबाकी वसुलीत हयगय करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी नुकताच दिला आहे.(प्रतिनिधी)
२४ सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा खंडित
By admin | Published: February 08, 2017 12:39 AM