वर्धा : कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेत खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी वर्धा शहर व ग्रामीण भागात ३६ तासांची सक्तीची संचारबंदी जाहीर केली. संचारबंदीच्या काळात प्रत्येकाने घरी रहावे या जिल्हा प्रशासनाच्या आवाहनाला आज वर्धावासियांनी स्वयंस्फूर्तीने प्रतिसाद दिला असला तरी जिल्ह्याचे स्थळ असलेल्या वर्धा शहरातील बाजारपेठ रविवारी बंद राहिल्याने सुमारे २५ कोटींच्या उलाढालीला ब्रेक लागला.संचारबंदीच्या काळात बहूतांश नागरिक घरातच थांबल्याने रस्ते निर्मनुष्य होते. तर पेट्रोलपंप, औषधीचे दुकाने वळगता इतर व्यावसायिक प्रतिष्ठाने, हॉटेल, रेस्ट्राॅरेंट, भाजीबाजार, खासगी व रापमची बससेवा पूर्णपणे बंद होती. संचारबंदीच्या काळात जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था असलेल्या नगरपालिका, नगरपंचायती, ग्रामपंचायती प्रशासनाच्यावतीने सार्वजनिक ठिकाण निर्जंतूक करण्यात आले. संचारबंदीदरम्यान रामपची प्रवासी बस सेवा बंद राहिल्याने रापमच्या वर्धा विभागाला सुमारे २६ लाखांचा आर्थिक फटका सहन करावा लागला आहे. त्याला रापमच्या वर्धा विभाग नियंत्रकांनीही दुजोरा दिला. एकूणच रविवारी वर्धा जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागात संचारबंदीला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असला तरी बाजारपेठेत होणाऱ्या उलाढालीला ब्रेक लागला होता.
वर्ध्यात सक्तीच्या संचारबंदीमुळे २५ कोटींच्या उलाढालीला ब्रेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 5:38 PM