नागरिकांना दिलासा : २२० के.व्ही.चे वीज वितरण केंद्र लोकमत न्यूज नेटवर्क कारंजा (घा.) : कारंजा तालुक्याचा वाढता विस्तार पाहता वीज ग्राहकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे विजेची मागणी वाढली. मागणीनुसार पुरवठा होत नसल्याने ग्राहकांना वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याचा सामना करावा लागतो. त्यामुळे कारंजा येथे १२३ के.व्ही.चे विद्युत केंद्र देण्याची खासदार रामदास तडस यांच्याकडे मागणी माजी आमदार दादाराव केचे यांनी केली होती. ही मागणी मान्य करण्यात आली असून येथे २२० के.व्ही.चे वीज केंद्र होणार आहे. राज्याचे उर्जा मंत्री बावणकुळे यांच्याकडे या मागणीबाबत पाठपुरावा करण्यात आला. सदर मागणी मान्य करीत कारंजा तालुक्याकरिता १२३ के.व्ही.चे केंद्र उभारण्याचा विचार असताना २२० के.व्ही.चे वीज वितरण केंद्र मंजूर करण्यात आले. त्यामुळे तालुक्यावासींना आता सुरळीत वीजपुरवठा मिळणार असून मागणीपेक्षा जादा वीज मिळणार असल्याने दिलासा व्यक्त करण्यात आला. सदर वीज वितरण केंद्र हेटीकुंडी परिसरात उभारले जाणार आहे. महिन्याभरात प्रत्यक्ष कामाला सुरूवात करणार असून तालुक्यात कारंजा, नारा, सावळी, हेटीकुंडी व कन्नमवारग्राम येथे कमी शक्तीची विद्युत केंद्र देण्यार येणार आहे. सध्यस्थितीत येथील पाच केंद्रांना तळेगाव येथून वीज पुरवठा होतो. वीज ग्राहकांची वाढती संख्या लक्षात घेता तळेगाव केंद्रावरुन होणारा वीज पुरवठा कमी पडत होता. त्यामुळे नवीन जोडणी घेताना कित्येक महिन्यांची प्रतीक्षा करावी लागत. यानंतर ग्राहकांना त्वरीत वीजजोडणी मिळू शकते. वारंवार ब्रेक डाऊन होत असल्याने वीज पुरवठा खंडित होऊन अनेकदा नागरिकांना काळोखात राहावे लागत. मागणीनुसार पुरवठा होत नसल्याने २०१७ पर्यंत ४५८ कृषीपंपाची जोडणी प्रलंबीत आहे. तसेच ६१ घरगुती, ११ व्यावसायिक तर ५ औद्योगिक जोडणी प्रलंबीत आहे. येथील रोहित्र व जनित्र खराब झाले आहे. वीज तारा जुन्या असल्याने वारा सुटला तरी तारा तुटतात. यामुळे वीजपुरवठा खंडित होतो. यासह विविध उपाययोजना करण्याकरिता कारंजा वीज वितरण कार्यालयाचे अभियंता सुधीर वानखेडे यांनी शासनाकडे १२३ केव्हीचे वीज केंद्र देण्याचा प्रस्ताव मंजूरीसाठी पाठविला होता. मात्र येथील समस्या लक्षात घेऊन १२३ के.व्ही. ऐवजी २२० के.व्ही.चे वीज केंद्र मंजूर करण्यात आले आहे. त्यामुळे कारंजावासीयांना अखंडित वीज पुरवठा करण्यातील अडचण दूर झाली आहे. सुरळीत वीज पुरवठ्याची मिळणार हमी कारंजा तालुक्यात ९० गावे असून ६० ग्रामपंचायत आहे. कारंजा नगरपंचायत पकडून तालुक्याची लोकसंख्या एक लाखाच्या घरात आहे. सद्यस्थितीत वीज वितरणचे ८ हजार ७ शेतकरी ग्राहक, ७५३ व्यावसायिक ग्राहक, १७ हजार ४२६ घरगुती ग्राहक तर २२९ औद्योगिक ग्राहक असे एकुण २६ हजार ४०९ ग्राहक आहेत. ही संख्या वाढत असल्याने येथे स्वतंत्र वीज केंद्र देण्याची मागणी होती. २२० केव्हीचे वीज वितरण केंद्र मंजूर केल्याने कारंजा एमआयडीसी तसेच सिंदीविहिरी येथे प्रस्तावित असलेल्या मेगाफुड पार्कला या केंद्राचा लाभ होणार आहे. या प्रकल्पाला अखंडित वीज पुरवठा करणे शक्य होईल.
२६ हजार ग्राहकांना मिळेल अखंडित वीज पुरवठा
By admin | Published: May 20, 2017 2:11 AM