महेश सायखेडेलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : विनापरवाना वाहन चालविणे कायद्यान्वये गुन्हा असून, अशा व्यक्तींवर वाहतूक पोलीस तसेच उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने दंडात्मक कारवाई करण्यात येते. सुरक्षित प्रवासासाठी वाहतुकीचे नियम पाळून वाहन चालविणे क्रमप्राप्त असून, मागील चार महिन्यांत २७ हजार ६८९ व्यक्तींनी वाहन चालविण्याचा परवाना मिळविण्यासाठी परीक्षा दिल्याचे वास्तव असून, तशी नोंद उपप्रादेशिक परिवहन विभागाने घेतली आहे. नागरिकांना गावातच किंवा गावापासून अवघ्या काही अंतरावरच वाहन चालविण्याचा शिकाऊ आणि कायमस्वरूपी परवाना मिळावा या उद्देशाने उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने तालुका स्तरावर, तसेच जिल्ह्यातील मोठ्या शहरांत शिबिर घेतले जाते. या शिबिर स्थळीही लर्निंग लायसन्ससाठी परीक्षा घेतली जातेच. अर्जदाराला कायमस्वरूपी वाहन चालविण्याचा परवाना देण्यापूर्वी त्याची प्रत्यक्ष परीक्षा उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने घेतली जात असून गत चार महिन्यांत १५,५०७ व्यक्तींनी वाहन चालविण्याचा शिकाऊ परवाना मिळण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने परीक्षा दिली. तर कायमस्वरूपी वाहन चालविण्याचा परवाना मिळण्यासाठी १२ हजार १८२ व्यक्तींनी प्रत्यक्ष ट्रायल दिली आहे.
दहा ठिकाणी घेतली जातात शिबिरे- गावात किंवा गावापासून अवघ्या काही अंतरावरच नागरिकांना वाहन चालविण्याचा परवाना मिळावा म्हणून वर्धा उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने जिल्ह्यातील तब्बल दहा ठिकाणी नियमित विशेष शिबिरे घेतली जातात. कोविड संकटात जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनदरम्यान ही शिबिरे बंद करण्यात आली होती; पण सध्या पुन्हा नव्या जोमाने ही शिबिरे घेतली जात आहेत.
परमनंटचा १२०, तर लर्निंगचा कोटा ७५- एकाच दिवशी तब्बल १२० व्यक्तींना कायमस्वरूपी, तर ७५ व्यक्तींना लर्निंग लायसन्स देता येईल इतका कोटा वर्धा येथील उपप्रादेशिक परिवहन विभागाचा असल्याचे सांगण्यात आले.