लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात प्रत्येक बालक सुदृढ व निरोगी राहावे, या हेतूने ३ जानेवारीपासून जिल्ह्यात ‘जॅपनीज एन्सेफलाइटिस व्हॅक्सिन मोहीम’ राबविण्यात येणार आहे. या मोहिमेदरम्यान १ ते १५ वयोगटातील जिल्ह्यातील २,७१,१९९ बालकांना जॅपनीज एन्सेफलाइटिसची लस दिली जाणार आहे. जॅपनीज एन्सेफलाइटिस लसीकरण मोहिमेसाठी जिल्हा प्रशासनातील जिल्हा परिषदेचा आरोग्य विभागाने संपूर्ण तयारी पूर्ण केली असून, ३ ते २२ जानेवारी या काळात तीन टप्प्यात ही लसीकरण मोहीम जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात शाळांमधील बालकांना लस दिली जाणार आहे; तर दुसऱ्या टप्प्यात अंगणवाडींमधील बालकांना जॅपनीज एन्सेफलाइटिसची लस दिली जाणार आहे. तसेच तिसऱ्या टप्प्यात शाळाबाह्य १ ते १५ वर्षांपर्यंतच्या बालकांचा शोध घेऊन त्यांना लस दिली जाणार आहे.
३,०१३२० डोस उपलब्धजिल्ह्यात जॅपनीज एन्सेफलाइटिस लसीकरण मोहीम राबविण्यासाठी जिल्ह्याच्या आरोग्य विभागाला जॅपनीज एन्सेफलाइटिस लसीचे ३ लाख १ हजार ३२० डोस प्राप्त झाले आहेत. हा लससाठा जिल्ह्यातील प्रत्येक रुग्णालयाला वितरित करण्यात आला आहे.
अन् नियमित लसीकरणाचा होणार एक भागशासनाच्या मार्गदर्शक सूचनांना केंद्रस्थानी ठेवून जिल्ह्यात ३ ते २२ जानेवारी या कालावधीत जॅपनीज एन्सेफलाइटिस लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. असे असले तरी ही मोहीम संपल्यावर जॅपनीज एन्सेफलाइटिस लस ही नियमित लसीकरणाचा एक भाग होणार असून, शासकीय रुग्णालयांमधून १ ते १५ वयोगटातील बालकांना लस दिली जाणार आहे.
मोहिमेत शिक्षकांचेही राहणार योगदानजिल्ह्यात जॅपनीज एन्सेफलाइटिस लसीकरण मोहीम १०० टक्के यशस्वी करण्यासाठी आरोग्य यंत्रणेतील आरोग्यसेवक, परिचारिका, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका यांच्यासह विविध शाळांमधील शिक्षकांचेही सहकार्य घेतले जाणार आहे.
जिल्ह्यात ३ ते २२ जानेवारी या काळात जॅपनीज एन्सेफलाइटिस लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. नागरिकांनीही आपल्या घरातील १ ते १५ वयोगटातील बालकांना लस देऊन आरोग्य विभागाला सहकार्य करावे.- डॉ. प्रभाकर नाईक, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी, वर्धा.
२०१९ मध्ये एकाचा घेतला होता बळीतीव्र ताप व डोकेदुखी, झटके येणे, मान ताठ होणे आदी जॅपनीज एन्सेफलाइटिसची लक्षणे आहेत. २०१९ मध्ये जिल्ह्यातील ५२ संशयितांची टेस्ट केली असता, आठ संशयितांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यावेळी एका रुग्णाचा जॅपनीज एन्सेफलाइटिसमुळे मृत्यूही झाला होता. तशी नोंद आरोग्य विभागाने घेतली आहे.