समीर कुणावार यांची माहिती : ग्रामीण उद्योगातील कामगारांना विमा हिंगणघाट : नगरपरिषदेच्या अस्थाई कर्मचाऱ्यांना स्थायी करण्याचा निर्णय मुख्यमत्र्यांनी जाहीर केला आहे. या निर्णयामुळे हिंगणघाट येथील २७२ कर्मचाऱ्यांना स्थाई करण्यात येणार आहे. याबाबत येथील कर्मचाऱ्यांनी आ. समीर कुणावार यांच्या मार्गदर्शनात लढा उभारला होता. तसेच २० जिल्ह्यातील ग्रामीण उद्योगातील लाखो कामगारांना विमा योजना लागू करण्याचा ऐतिहासिक निर्णयही राज्य शासनाने घेतल्याचे यावेळी आमदार समीर कुणावर म्हणाले. राज्य शासनाने राज्यातील एकूण १३८ नगर परिषद पंचायतीमध्ये आकृतीबंधाने पदनिर्मितीचा निर्णय घेतला असून यामध्ये राज्यातील पालिकांमधील अतिरिक्त ठरलेल्या अनुभवी कर्मचाऱ्यांना तसेच अस्थायी कर्मचाऱ्यांचे समायोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. नगरपंचायतीच्या नवीन आकृतीबंधानुसार राज्यात २ हजार ३६८ कर्मचारी पदनिर्मिती होणार असून यात हिंगणघाट नगरपरिषदेतील २७२ अस्थायी कर्मचाऱ्यांसह राज्यातील अन्य नगरपरिषदांमधील १ हजार ३१५ अस्थायी व अतिरिक्त कर्मचाऱ्यांचे समायोजन होणार आहे. स्थानिक नगरपरिषदेत १९९० पासून आकृतीबंधामुळे सद्यस्थितीत अतिरिक्त ठरणाऱ्या २७२ कर्मचाऱ्यांची समस्या कित्येकदा अनेक वर्षांपासून शासन स्तरावर मांडण्यात येत होती. या कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा दरवर्षी ३ कोटी रुपये अस्थापनाचा खर्च नगपरिषदेवर व पर्यायाने नागरिकांवर पडून कर्मचारी सुध्दा आर्थिक संकटात सापडले होते. अशा स्थितीत या कर्मचाऱ्यांना स्थायी करण्यासाठी न.पा. कर्मचारी संघटनेच्या पुढाऱ्यांनी आ. कुणावार यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेवून या कर्मचाऱ्याची समस्या मांडली व राज्यातील नगरपंचायतीच्या आकृतीबंद पदनिर्मितीत या कर्मचाऱ्यांना समाविष्ट करण्याची आ. समीर कुणावार यांची कल्पना मुख्यमंत्री अर्थमंत्र्यासह सर्वांनी उचलून धरली. त्यामुळेच हा निर्णय झाल्याचे कर्मचारी बोलत आहेत. नगर पंचायतींना मिळणार अनुभवी कर्मचारीहिंगणघाट : शासनाच्या निर्णयामुळे नगर पंचायतींना अनुभवी कर्मचारी मिळणार असून सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांना स्थायी सेवेत सामावून घेतले जाणार आहे. स्थानिक नगर परिषद कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सुरेश आडेपवार यांनी याबाबत मनोगत व्यक्त करताना आ. समीर कुणावार यांच्या प्रयत्नातून शासनाने पवित्र रमजान ईदच्या पर्यावर ईदी दिल्याचा आनंद व्यक्त करीत त्यांचे आभार मानले. यावेळी न.प. चे शशिकांत बोकडे, नरेंद्र पिंपळशेंडे, प्रकाश लंके, रफीक आदीसह न.प. कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आ. समीर कुणावार यांनी आयोजित पत्रपरिषदेत माहिती देताना राज्य शासनाने ग्रामीण उद्योगातील कर्मचाऱ्यासाठी घेतलेल्या विमा योजनेची माहितीही दिली. शासन निर्णयानुसार हिंगणघाट, समुद्रपूर तालुक्यातील जवळपास १५ हजार कर्मचाऱ्यांना कर्मचारी विमा योजनेचा लाभ मिळणार असून या कर्मचाऱ्यांसोबतच राज्यातील २० जिल्ह्यातील लाखो कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे. कर्मचारी राज्य विमा योजनेंतर्गत हिंगणघाट, समुद्रपूर तालुक्यातील ग्रामीण कापड उद्योगातील कर्मचाऱ्यांना लाभ मिळावा, अशी मागणी आ. समीर कुणावार यांच्यामार्फत वर्धा जिल्हा सुती मिल मजदूर संघाच्यावतीने राज्य शासनाकडे लावून धरली होती. या कामगार विमा योजनेंतर्गत ई.एस.आय. च्या रुग्णालयात ग्रामीण उद्योगानमार्फत उपचार होणार असून आजाराचे दरम्यान सुटीचे अर्ध वेतनास पात्र राहणार आहे. सोबतच महिलांना बाळंतपणासाठी मोफत औषधोपचार, सुट्या, मृत कामगारांना अंत्याविधीचा खर्च आदी सोयी मिळणार आहेत. या योजनेची अंमलबजावणी येत्या काही दिवसांत होणार असल्याचे आ. कुणावार यांनी सांगितले. या पत्रपरिषदेला वर्धा जिल्हा सुती मिल मजदूर संघाचे मिलिंद देशपांडे, माजी न.प. उपाध्यक्ष प्रेम बसंतानी, सुभाष कुंटेवार, पांडुरंग बालपांडे, दामोधर देशमुख, जयंत बावणे, प्रशांत शेळके, दिवाकर बरबटकार, विलास हिवंज, देवेंद्र हिवरकर, नगरसेवक विठ्ठल गुळघाने, नगरसेविका निता धोबे, शुभांगी डोंगरे, शारदा पटेल आदींसह भाजपा कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.(तालुका प्रतिनिधी)
पालिकेचे २७२ कर्मचारी होणार स्थायी
By admin | Published: July 08, 2016 2:06 AM