लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : उन्हाळ्याच्या दिवसांत जिल्ह्यातील काही गावांना जलसंकटाला सामारे जावे लागत असल्याचे वास्तव असले तरी महाकाळी येथील धाम प्रकल्प जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या वर्धा शहरासह परिसरातील २० गावांच्या तृष्णातृप्तीसाठी फायद्याचाच ठरतो. सध्या या जलाशयात २९.८५ दलघमी जिवंत जलसाठा आहे. यंदा जिल्ह्यात मार्च महिन्यातच सूर्य आग ओकू पाहत आहे. परिणामी अनेक नागरिकांनी त्यांच्याकडील कुलर सुरू केल्याने पाण्याचा वापरही वाढला आहे. जिल्ह्यातील मध्यम व मोठ्या जलाशयांत सद्यस्थितीत समाधानकारक जलसाठा असला तरी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर न झाल्यास नागरिकांना जलसंकटाचा तोंडच द्यावे लागणार आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने उपलब्ध पाण्याचा काटकसरीनेच वापर करण्याची गरज आहे.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, वर्धा न.प. प्रशासन करते उचल- वर्धा शहरातील नागरिकांना वर्धा नगरपालिका प्रशासनाच्यावतीने पाणी पुरवठा केला जातो. तर वर्धा शहराशेजारील गावांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पाणीपुरवठा करते. स्थानिक स्वराज्य संस्था असलेले वर्धा नगरपालिका प्रशासन आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या दोन्ही पाणी उचल संस्था धाम नदीच्या येळाकेळी तसेच पवनार येथील नदीपात्रातून पाण्याची उचल करतात.
पिण्यासाठी मागणीनुसार सोडणार धाम प्रकल्पातून पाणी- जिल्ह्यातील प्रत्येक मध्यम व मोठ्या जलाशयातील काही टक्के जलसाठा सिंचनासाठी तसेच पिण्यासाठी आरक्षित करण्यात आला आहे. उन्हाळ्याची चाहूल लागण्यापूर्वी वर्धा पाटबंधारे विभागाच्यावतीने जलाशयांमधून सिंचनासाठी पाणी सोडण्यात आले. तर आता पाणी वापर संस्थांच्या मागणीनुसारच जलाशयांमधून पिण्यासाठी पाणी सोडले जाणार आहे.
सिंचनासाठी धाममधून सोडले २८.०३ दलघमी पाणी- पावसाळ्याच्या दिवसांत १०० टक्के भरलेल्या महाकाळी येथील धाम प्रकल्पातून यंदा सिंचनासाठी तब्बल २८.०३ दलघमी पाणी सोडण्यात आले आहे. ५९.४८५ दलघमी एकूण साठवण क्षमता असलेल्या या जलाशयात सद्यस्थितीत २९.८५ दलघमी जिवंत जलसाठा आहे. हाच जलसाठा उन्हाळ्यातील जलसंकटावर मात करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.