लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील ४१४ शेतकऱ्यांना अखेर ८ वर्षांनंतर न्याय मिळाला असून, बँक खात्यात ३ कोटी ६१ लाख ४८८ रुपये जमा करण्यात आले आहेत. आता सेलू येथील तहसीलदारांच्या सूचनेवरून संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. सन २०१४ मध्ये वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील ४१४ शेतकऱ्यांनी २० हजार क्विंटल कापूस सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्यापारी सुनील टालाटुले यांना विक्री केला होता. मात्र, सुनीलने एकही पैसा शेतकऱ्यांना दिला नव्हता. शेतकरी नेते रामनारायण पाठक यांच्या नेतृत्वात त्रस्त शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. २०१८ मध्ये व्यापारी टालाटुले याच्या मालमत्तेचा लिलाव करून शेतकऱ्यांचे पैसे देण्याचा आदेश न्यायालयाने दिला होता. या आदेशान्वये सेलू येथील तहसीलदारांनी २०२१ मध्ये व्यापारी टालाटुले याच्या मालमत्तेचा लिलाव करण्याची प्रक्रिया राबविली. टालाटुले याचे सिंदी रेल्वे येथील शेत आणि लेआउटचा लिलाव झाला. या लिलावात सरकारला ३ कोटी ६२ लाख रुपये मिळाले आहेत. तहसीलदार, सेलू यांनी बँक ऑफ इंडिया व सहायक निबंधक सहकारी संस्था, सेलू यांना पत्र पाठवून लिलावातून मिळालेली रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याच्या सूचना दिल्या असून पैसे जमा करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.
...अन् मोफत चालविला खटला...फसवणूक करणाऱ्या टालाटुले या व्यापाऱ्याविरोधात शेतकऱ्यांना न्यायालयात खटला लढावा लागला. मात्र, शेतकरी आर्थिक अडचणीत आले असल्याने या प्रकरणात ॲड. शंतनू भोयर यांनी शेतकऱ्यांचा हा खटला मोफत लढण्याचा निर्णय घेतला. ४ वर्षे हा खटला लढण्यासाठी शेतकऱ्यांकडून एक छदामही त्यांनी घेतला नाही, हे विशेष.
शेतकऱ्यांना १२ टक्के व्याजासह पैसे परत करण्याचा आदेश आहे. त्यामुळे सुनील टालाटुलेकडून वसूल करण्यात येणारी रक्कम ८ कोटींवरून १२ कोटींवर पोहोचली आहे. उर्वरित रक्कम मिळण्यासाठी पुन्हा उच्च न्यायालयात धाव घेणार आहोत. - रामनारायण पाठक, शेतकरी नेते.