वर्धा : तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष प्रभाकर फटींग यांच्यावर तलवारीने हल्ला करणाऱ्या दोन आरोपीना प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी अ. रा.सुर्वे यांनी तीन महिन्यांच्या सक्षम कारावासाची शिक्षा ठोठावली. प्रकरण असे की, गावातील वाद गावातच मिटविण्यात यावे यासाठी शासन निर्देशानुसार प्रत्येक गावात तंटामुक्ती समितीची स्थापना येते.अल्लीपूर येथील तंटामुक्त समिती गठीत झाल्यानंतर फटींग यांच्या माध्यमातून गावातील वाद गावातच मिटविले जात होते. परंतु 20 मे 2012 रोजी अल्लीपुर येथील विजय कलोडे व गजानन कलोडे यांनी प्रभाकर फटींग यांच्यावर कृषी केंद्राजवळ हल्ला केला होता. वसंता कलोडे यांच्यासोबत झालेल्या वादात तुम्ही हस्तक्षेप का केला ? असा आरोपींचा आक्षेप होता. यावेळी विजयने फटींग यांच्या डोळ्यावर दगड मारला तर गजाननने तलवारीच्या मुठीने छातीवर मारहाण केली होती.शरीरातून रक्तस्त्राव झाल्यामुळे या घटनेची तक्रार प्रभाकर फटींग यांनी अल्लीपुर पोलीस ठाण्यात दाखल केली होती. पोलिसांनी 323 506 (34) नुसार गुन्हा दाखल केला. हेडकॉन्स्टेबल बळवंत पिंपळकर यांनी तपास करून आरोपपत्र न्यायालयात दाखल केले. सरकारच्यावतीने सहायक सरकारी अभियोक्ता मीनाक्षी बेलसरे यांनी सात साक्षीदार तपासले. तर आरोपींच्या बचावार्थ काही मुद्दे समोर आले. परंतु सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायालयाने दोन्ही आरोपीना प्रत्येकी तीन महिने सक्षम कारावास व प्रत्येकी 1 हजार दंड अशी शिक्षा ठोठावली. दंड न भरल्यास 15 दिवसाची शिक्षा भोगावी लागेल असेही न्यायालयाने म्हटले आहे.
तंटामुक्ती अध्यक्षावरील हल्ल्याप्रकरणी आरोपींना 3 महिन्यांची शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2018 4:09 PM