लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम अंतर्गत दरवर्षी आरटीई-२५ टक्के प्रवेश प्रक्रिया राबविली जाते. याही वर्षी सन २०२१-२२ या शैक्षणिक सत्राकरिता प्रवेश प्रक्रिया राबविली जात असून अर्ज दाखल करण्याकरिता ३० मार्चपर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यामुळे अखेरच्या दिवसापर्यंत जिल्ह्यातील १ हजार १२९ जागांकरिता तब्बल ३ हजार ३०६ बालकांनी अर्ज दाखल केले आहे.आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत सर्व माध्यमांच्या खासगी, विनाअनुदानित व स्वयंअर्थसहाय्यित शाळांमध्ये नर्सरी व पहिलीत मोफत प्रवेश दिला जातो. यावर्षी आठहर तालुक्यात २०२१-२२ या शैक्षणिक सत्राकरिता ११८ शाळांमध्ये १ हजार १२९ जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. यामध्ये ११६ शाळांमधील पहिलीकरिता १ हजार ८१ तर २ शाळांमधील नर्सरीकरिता ४८ जागांचा समावेश आहे. १ हजार १२९ जागांकरिता तब्बल ३ हजार ३०६ बालकांनी अर्ज दाखल झाल्याने अनेक विद्यार्थ्यांना प्रवेशापासून मुकावे लागणार आहे.
आता लक्ष लॉटरीकडेराज्यभरातील आरटीई प्रवेशासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया राबविण्यात आली. अर्ज दाखल झाल्यानंतर आता लॉटरीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याहीवर्षी कोरोनाचा प्रकोप असल्याने एकाच वेळी ऑनलाईन पद्धतीने लॉटरी निघण्याची शक्यता आहे. यात कुणाला संधी मिळणार ही येणारी वेळच सांगणार आहे.
आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेंतर्गत जिल्ह्यातील ११८ शाळांनी नोंदणी केली आहे. यात ११६ शाळांनी पहिलीसाठी तर दोन शाळांनी नर्सरीसाठी नोंदणी केली.३० मार्च ही अर्ज दाखल करण्याची अंतीम मुदत होती. त्यामुळे ३ हजार ३०६ विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले आहे. आता लॉटरीनंतर प्रवेश प्रक्रिया सुरु केली जाईल.- निंबाजी सोनवणे, शिक्षणाधिकारी प्राथ.
..तर मोठ्या शाळेचे स्वप्नही पाहू शकत नाही
इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये मुलांना प्रवेश देणे सर्व सामान्यांच्या आवाक्या बाहेर आहे. त्यामुळे आरटीई अंतर्गत राबविल्या जाणाऱ्या प्रवेशप्रक्रियेमुळे सर्वसामान्यांच्या मुलांना चांगल्या शाळेत प्रवेश मिळतो. पण, यातील वेळखाऊ व किचकट आहे.- सुरेश देशमुख
खासगी शाळांमध्ये पहिलीमध्ये प्रवेश घ्यायचा असल्यास दहा हजार रुपयांपेक्षा अधिक शुल्क मोजावे लागतात. दरवर्षी शुल्कात वाढ होत असल्याने ती रक्कम भरणे शक्य नाही. त्यामुळे मुलेही शिक्षणापासून वंचित राहण्याची शक्यता असते. आरटीईमुळे पालकांना आधार मिळतो.- गणेश चलाख
नर्सरीपासूनच मुलांच्या शिक्षणासाठी पैसे मोजावे लागतात. दरवर्षी महागडे शिक्षण देणे शक्य होत नाही. तरीही मुलांच्या भवितव्याचा विचार करुन पदमोड करावी लागते. आरटीई प्रवेश प्रक्रियेमुळे पालकांना दिलासा मिळत आहे. पण, गरजू वंचित राहू नये.- पुरुषोत्तम ढोले