लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मिनी मंत्रालय म्हणून ओळख असलेल्या जिल्हा परिषदेमध्ये अनेक कर्मचारी गैरहजर राहत असल्याच्या तक्रारी होता. यातच आज जि.प. मध्ये शुकशुकाट आढळून आला. यामुळे अध्यक्षांनी प्रत्येक विभागात जाऊन चौकशी केली असता तब्बल ३० कर्मचारी कुठलीही पूर्वसूचना न देता बेपत्ता असल्याचे आढळून आले. या प्रकरणी सर्व कर्मचाऱ्यांच्या नोंदी घेत जि.प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सूचित करण्यात आले आहे.शासकीय कार्यालयांमध्ये कार्यालयीन वेळेत उपस्थित राहण्याच्या सूचना सर्वच अधिकारी, कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. असे असले तरी अर्ज न करता तथा पूर्वसूचना न देता कर्मचारी गैरहजर राहत असल्याच्या तक्रारी होत्या. गुरूवारी सकाळी ११ वाजता जि.प. अध्यक्ष नितीन मडावी जिल्हा परिषदेत पोहोचले असता सर्वत्र शुकशुकाट दिसून येत होता. यामुळे त्यांनी विचारणा केली असता डीआरडीएची परीक्षा असून नागपूर हे केंद्र असल्याने अधिकारी तेथे गेल्याचे सांगण्यात आले. जि.प. मध्ये कार्यकारी अधिकारी गहलोत व कृषी विकास अधिकारी धर्माधिकारी हे दोनच अधिकारी उपस्थित होते. अधिकारी नसल्याची संधी साधत सर्वच विभागातील कर्मचाऱ्यांनी बुट्ट्या मारल्याचे लक्षात आले. विचारणा केली असता टाळाटाळ केली जात होती. यामुळे जि.प. अध्यक्ष मडावी यांनी सर्वच विभागांतील हजेरी रजिस्टर मागविले. यात तब्बल २८ ते ३० कर्मचारी कार्यालयात आलेच नसल्याचे दिसून आले. गैरहजर असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांच्या मडावी यांनी नोंदी घेत त्याबाबत जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी अजय गुल्हाणे यांना सूचित केली. शिवाय यापूढे असा प्रकार घडू नये म्हणून गैरहजर असलेल्या कर्मचाऱ्यांवर कार्यवाही करण्याची शिफारस केली. अधिकारी नसल्यास कर्मचारी मनमानी करीत असल्याचे आज खुद्द अध्यक्षांच्याच पाहणीत उघड झाले.
विविध विभागांत ३० कर्मचारी बेपत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 11:35 PM
मिनी मंत्रालय म्हणून ओळख असलेल्या जिल्हा परिषदेमध्ये अनेक कर्मचारी गैरहजर राहत असल्याच्या तक्रारी होता. यातच आज जि.प. मध्ये शुकशुकाट आढळून आला. यामुळे अध्यक्षांनी प्रत्येक विभागात जाऊन चौकशी केली असता तब्बल ३० कर्मचारी कुठलीही पूर्वसूचना न देता बेपत्ता असल्याचे आढळून आले.
ठळक मुद्देजिल्हा परिषदेतील प्रकार, अध्यक्षही अवाक