हत्यांचे सत्र सुरूच : आरोपी पकडणे सोपे; आळा घालणे कठीण रूपेश खैरी ल्ल वर्धा अहिंसेचा संदेश देणाऱ्या महात्मा गांधी यांच्या तत्त्वांची शिकवण आत्मसात करण्याकरिता देशभऱ्यातील नेते, समाजसवेक सेवाग्रामच्या बापू कुटीत येतात; मात्र ही कुटी असलेल्या वर्धा जिल्ह्यालाच त्यांच्या अहिंसा तत्त्वाचा विसर पडला आहे. जिल्ह्यात अवघ्या आठ महिन्यात ३० हत्यांची नोंद झाल्याने चांगलीच खळबळ माजली आहे. जिल्ह्यात सुरू झालेले हत्यांचे सत्र अजूनही सुरूच असल्याचे वर्धेतील संगीता परसराम हिच्या हत्येने उघड झाले. जिल्ह्यात सुरू वर्षाच्या जानेवारी ते जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत एकूण २८ हत्यांची नोंद झाली आहे. यात आॅगस्ट महिन्यात दोन हत्यांची नोंद झाल्याने हा आकडा ३० वर पोहोचला आहे. अर्ध्या वर्षात हत्येचा आकडा ३० वर गेल्याने वर्षाच्या अखेरीस हा आकडा कितीवर पोहोचतो याचा अंदाज बांधणे कठीण होत आहे. जिल्ह्यात घडलेल्या प्रकरणातील जवळपास सर्वच आरोपींना अटक असल्याचे सांगण्यात आले आहे. असे असले तरी यावर आळा घालण्याची गरज वर्तविण्यात येत आहे. सोमवारी वर्धेत झालेल्या हत्येत पोलिसांनी पहिले गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केल्याने हा प्रकार घडल्याचा आरोप होत आहे. यामुळे घडलेल्या या हत्या प्रकरणात कुठे ना कुठे पोलिसांकडून झालेली हयगय एक कारण असल्याचे बोलले जात आहे. समुद्रपूर येथे झालेल्या छत्रपती थुटे यांच्या हत्येतही पहिले झालेली पोलीस तक्रार एक कारण असल्याची चर्चा तालुक्यात आहे. या प्रकरणात पोलिसांकडून तपासात हयगय झाल्याने कदाचित छत्रपतींना जीव गमवावा लागला, अशी चर्चा आहे. जुलै महिन्यात हत्येच्या कारणांनी चर्चेत असलेला जिल्हा आॅगस्ट महिन्याच्या प्रारंभी यातून सुटला असे वाटले होते. मात्र सोमवारी सकाळी संगीता परसराम हिची चाकूने गळा कापून दगडाने ठेचत हत्या केल्याने वर्धेतील क्रूर हत्यांची परंपरा कायमच आहे. जानेवारी महिन्यात हत्येच्या एका गुन्ह्याने सुरू झालेले हत्येचे सत्र आॅगस्ट महिन्यातही थांबले नाही. सर्वाधिक सात हत्या मे महिन्यात झाल्याचे दिसून आले आहे.
आठ महिन्यात ३० हत्या
By admin | Published: August 31, 2016 12:57 AM