तरुण शेतकऱ्याने स्वीकारला जोडधंदा : देवळी तालुक्यातील नांदोरा येथील युवा शेतकऱ्याचा प्रयत्न लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : शेतीला पुरक व्यवसायाची जोड दिल्यास शेतकऱ्यांच्या उत्पन्नात निश्चित वाढ होते. येथील एका तरुण शेतकऱ्याने भर उन्हाळ्यात राहत्या घरातील दहा बाय दहाच्या खोलीत मशरूमचे उत्पादन सुरू केले आणि केवळ एक महिन्यात त्याला ३० हजार रुपयांचा नफा झाला. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी मशरुम उत्पादन हा नवीन जोडधंदा बनू शकतो याचा राजमार्ग या शेतकऱ्याने दाखवला आहे. या शेतकऱ्यांचे नाव श्रीकृष्ण वायरे, असे आहे. देवळी तालुक्यातील १,३५० डोकी असलेल्या नांदोरा या गावातील हा तरुण शेतकरी आहे. त्याचा घरी नऊ एकर शेती असून यावर्षी शेतीतही त्याने भरघोस पीक घेतले. जानेवारी महिन्यात समन्वयित कृषी विकास प्रकल्पामार्फत गावातच मशरुम उत्पादनाचे प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षण घेतलेल्या २५ शेतकऱ्यांपैकी श्रीकृष्ण वायरे यांनी दुसऱ्याच दिवशी घरातीलच एका खोलीत ४०० बेड तयार केलेत. समन्वयित कृषी विकास प्रकल्पामार्फत त्यांना बीज पुरवठा करण्यात आला. मशरुमसाठी २७ डिग्री सेल्सीयस अंशाचे तापमान राखावे लागते. त्यामुळे मार्च महिन्यात खोलीचे तापमान स्थिर ठेवण्यासाठी वायरे यांनी २ कुरलरची व्यवस्था केली. मशरुमला दमट वातावरण आवश्यक असल्यामुळे त्यांनी रात्रंदिवस बेडवर पाणी शिंपडले. केवळ १८ दिवसांतच त्यांच्या मेहनतीला फळ आले. मशरुमचा पहिला, दुसरा व तिसऱ्या तोड्यानंतर त्यांना एका महिन्यात ४० किलो सुकलेल्या मशरुमचे उत्पादन मिळाले. मशरुमला बाजारपेठ उपलब्ध करून देण्याची व्यवस्था समन्वयित कृषी विकास प्रकल्पाने केली. भारत मशरूम, वर्धा यांनी मशरुम पावडर तयार करण्यासाठी या शेतकऱ्यांकडून मशरुम विकत घेण्याचा करार केला. एक किलो मशरुमचे दर ४०० रुपये प्रती किलो असून सुकलेल्या मशरुमचे दर ८०० रुपये प्रती किलो आहेत. श्रीकृष्ण वायरे यांना एक महिन्यात ३० हजार रुपयांचा नफा झाला. यामध्ये प्रकल्पाकडून त्यांना एकूण खर्चाच्या ३० टक्के अनुदान मिळाले. त्याचबरोबर मशरुम बेडमध्ये जिवाणूंचे प्रमाण जास्त असल्याने त्याचा कंपोस्ट खत म्हणून करता येतो. अतिशय कमी साधने, कमी कालावधी आणि कमी जागेत लवकर नफा मिळवून देणारे म्हणून मशरुम उत्पादन फायदेशीर ठरते. त्यामुळे शेतकऱ्यांनी हा जोडधंदा म्हणून केल्यास शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल असे मत त्यांनी व्यक्त केले. दहा बाय दहाच्या खोलीत मशरूमचे उत्पादन बेड तयार करण्यासाठी प्लास्टिक पिशवी, दोरी, सोयाबीन, गहू किंवा पऱ्हाटीचे कुटार, स्पॉन (बीज), उत्तम कालावधी, मशरुम उत्पादनासाठी जुलै ते मार्च हा कालावधी उत्तम आहे. कारण या महिन्यांमध्ये तापमान कमी असल्यामुळे तापमान राखण्यासाठी कुलरची आवश्यकता भासत नाही. त्यामुळे हा खर्च वाचतो. यासाठी एकावेळी येणाऱ्या एकूण खर्चाच्या ३० टक्के अनुदान शासनाकडून देण्यात येते. मशरुमचे फायदे मशरुममध्ये मोठ्या प्रमाणात पोषक तत्व आहेत. प्रथिने अ, क़, ड जीवनसत्वे आणि सर्व प्रकारची खनिजांची शरीराची गरज मशरुम पूर्ण करू शकते. काही आदिवासी भागात याचा वापर कुपोषित मुलांसाठी करण्यात येत आहे.
मशरुम उत्पादनातून एक महिन्यात ३० हजारांचा नफा
By admin | Published: May 21, 2017 1:04 AM