वर्धा : निसर्ग सेवा समितीद्वारा निर्मित ऑक्सिजन पार्क निसर्ग हिल्स परिसरात अचानक लागलेल्या आगीत आयटीआय टेकडी परिसरातील विविध प्रजातींच्या सुमारे ३ हजार वृक्षांसोबतच ड्रीपला आग लागून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अज्ञाताकडून जाणीपूर्वक ही आग लावल्याचे निदर्शनास आले.
यामध्ये सुमारे पाच वर्षांपूर्वी लावलेली झाडं तसेच ड्रीपचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. प्रसंगावधान साधतात नगरपरिषदेचे अग्निशमन दलाचे नीलेश किटे यांनी टेकडी परिसरात लागलेल्या आगीची पाहणी केली. आंबेडकर समाजकार्य महाविद्यालयातील संपूर्ण मुला-मुलींनी आग आटोक्यात आणली.
आगीवर वेळीच नियंत्रण मिळविल्याने २० हजारावर झाडं बचावली. नागरिकांनी कचरा बाहेर न जाळता नगरपालिकेच्या घंटागाडीत त्याची विल्हेवाट लावण्याची गरज असल्याचे आवाहन निसर्ग सेवा समितीचे मुरलीधर बेलखोडे यांनी केले आहे.
आग विझविण्यासाठी डॉ. आंबेडकर कॉलेज ऑफ सोशल वर्कच्या श्रम संस्कार शिबिरात सहभागी १०० राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी मोलाचे योगदान दिले.