लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात झालेल्या गारपिटीच्या नुकसानीचा अहवाल तीन दिवसात सादर करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आल्या. त्या सूचनेनुसार कृषी आणि महसूल विभागाच्यावतीने प्राथमिक अहवाल तयार केला आहे. या अहवालानुसार ६ हजार ६०३.७० हेक्टरवर नुकसान दर्शविण्यात आले आहे. असे असताना मदत मात्र ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान असलेल्या शेतकऱ्यांनाच मिळणार आल्याची माहिती कृषी विभागाने दिली. या निकषात जिल्ह्यातील ३ हजार २७५.२२ हेक्टर क्षेत्र बसत असल्याने इतरांना मात्र नुकसान सहन करावे लागणार आहे.फेब्रुवारी महिन्याच्या ११ ते १४ तारखेपर्यंत जिल्ह्यात गारपीट, वादळी वारा आणि पावसाने चांगलेच थैमान घातले. याचा फटका जिल्ह्यातील तब्बल २२२ गावांना बसला. या वादळामुळे अनेक घरांचे नुकसान झाले. तर आर्वी तालुक्यातील पिंपळझरी गाव अक्षरश: उद्ध्वस्त झाले. सध्या रबी हंगाम असून शेतात गहू आणि हरभरा व भाजीपालावर्गीय पिके आहेत. यात पिकांना या पावसाचा चांगलाच फटका बसला आहे. पावसासह आलेली गारपीट आणि वारा यामुळे पिकांचे चांगलेच नुकसान झाले. या नुकसानात ३ हजार २२०.५० हेक्टरवरील नुकसान ३३ टक्क्यांच्या आत आहे. यामुळे या क्षेत्रातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार नसल्याचे दिसून आले आहे.या वादळी पावसाचा सर्वाधिक फटका जिल्ह्यात कारंजा तालुक्याला बसला आहे. या तालुक्यात एकूण १ हजार ६२५ हेक्टरवर नुकसान झाले. वर्धा आणि सेलू तालुक्यातील नुकसान ३३ मदतीच्या निकषात बसत नसल्याचे सांगण्यात आले आहे. इतर तालुक्यातील नुकसान मदतीकरिता पात्र ठरत असल्याचे सांगण्यात आले आहे. असे असले तरी कृषी विभागाने सादर केलेला हा अहवाल बदलण्याची शक्यता आहे. राज्य शासनाच्या त्रिस्तरीय सदस्यांकडून पाहणी केल्यानंतर अंतिम अहवाल सादर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. या अंतिम अहवालानंतरच मदती संदर्भात निर्णय होणार आहे.सर्वाधिक नुकसान हरभऱ्याचेया गारपिटीमुळे सर्वाधिक नुकसान हरभरा पिकाचे झाले आहे. जिल्ह्यात एकूण १ हजार ३९६.८० हेक्टरवर हरभऱ्याचे नुकसान झाल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. १ हजार २७६. ४० हेक्टरवर गव्हाचे नुकसान झाल्याचे अहवालात नमूद आहे. २९१ हेक्टरवर भाजीपाला, १५ हेक्टर तूर आणि ३९ हेक्टरवर फळपिकांचे नुकसान झाले.
३२७५.२२ हेक्टरवर नुकसानालाच मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 10:18 PM
जिल्ह्यात झालेल्या गारपिटीच्या नुकसानीचा अहवाल तीन दिवसात सादर करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आल्या. त्या सूचनेनुसार कृषी आणि महसूल विभागाच्यावतीने प्राथमिक अहवाल तयार केला आहे.
ठळक मुद्दे६६०३.७० हेक्टर नुकसान : सर्वाधिक नुकसान कारंजा तालुक्यात